(चिपळूण)
विश्वासाने दिलेले चारचाकी वाहनाचे दोन हप्ते भरल्यानंतर उर्वरित हप्ते भरले नाहीत. शिवाय चारचाकीचा ताबाही मालकास दिला नाही. यातूनच ९० हजारांच्या फसवणुकीचा प्रकार घडल्याने याप्रकरणी एकावर चिपळूण पोलिस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नासीर शकील टाके (चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद फैसल नजीरखान सरगुरो (३८, चिपळूण) यांनी दिली आहे. सरगुरो व टाके हे एकमेकाच्या ओळखीचे आहेत. सरगुरो यांचा वाहने खरेदी – विक्रीचा व्यवसाय आहे. ऑगस्ट २०२२मध्ये त्यांना स्वतःची चारचाकी गाडी टाके याला विकायची होती. ती चालवून पाहिल्यानंतरच विकत घेण्याचे ठरले होते. सरगुरो यांनी गाडी टाके याच्या ताब्यात दिली. गाडीचे सुरुवातीचे दोन हप्ते टाकेने भरले. मात्र, पुढील हप्ते न भरता तसेच चारचाकीचा ताबाही सरगुरो यांना न देता स्वतःकडे ठेवली.
काही महिन्यांनी या चारचाकीची सरगुरो यांनी टाके याच्याकडे चौकशी केली असता ही चारचाकी गहाण ठेवली असल्याचे त्यांना सांगितले. यातूनच टाके याने आपली ९० हजारांची फसवणूक केल्याची फिर्याद सरगुरो यांनी दिली आहे. त्यानुसार टाकेवर गुन्हा दाखल केला आहे.