रत्नागिरी:- चिपळूणमधील महापुरात शिवनदीच्या किनार्यावरील कोविड केंद्रात मृत पावलेल्या ‘त्या’ नऊ जणांच्या नातेवाईकांना आपत्कालीन निधीतून मदत मिळावी यासाठी विशेष प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून पाठविण्यात येणार आहे. त्यांचा मृत्यूला आपत्कालीन परिस्थिती कारणीभूत आहे का याची चाचपणी केली जाणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात २२ जुलैला आलेल्या पुराने चिपळूण व खेडमध्ये हाहाकार उडाला होता. वाशिष्ठी, शिवनदीचे पाणी चिपळूण शहरात शिरले होते. शहरातील पाणी पातळी १५ फुटाहून अधिक होती. अचानक पाणी आल्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासह वेळ मिळालेला नव्हता. या पुराचा फटका कोविड केंद्रांनाही बसला होता. चिपळूणात शिवनदीच्या काठावर असलेल्या खेडेकर क्रीडा संकुलाच्या इमारतीत कोवीड केंद्र सुरु करण्यात आले होते. त्या केंद्राच्या पहिल्या मजल्यावर पुराचे पाणी शिरले. त्यामुळे जनरेटरसह, ऑक्सिजन यंत्रणाही बंद पडली होती. तेथील कर्मचार्यानी यावेळी रुग्णांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. अगदी बचाव पथकही या केंद्राजवळ आले होते; परंतु पाण्याच्या वेगापुढे बोटही थांबू न शकल्याने पथकाला माघारी परतावे लागले. त्यानंतर ऑक्सिजन यंत्रणा बंद पडल्यामुळे २१ रुग्णांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला. ते रुग्ण कोरोनाबाधित असले तरीही पुर परिस्थितीमुळे उपचारासाठीची यंत्रणा बंद पडल्याने त्यांचा अवेळी मृत्यू झाला.
या रुग्णांच्या नातेवाईकांना अद्याप नैसर्गिक आपत्तीची मदत देण्यात आलेली नाही. नैसर्गिक आपत्तीत पूरात वाहून जाणे, दरड कोसळणे यासारख्या घटनांमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत दिली जाते. जिल्ह्यात या प्रकारे मृत पावलेल्या ३३ जणांच्या नातेवाईकांना मदत वाटप करण्यात आली. परंतु कोविड बाधित त्या मृत नऊ जणांच्या नातेवाईकांना अजुनही मदत दिलेली नाही. त्यांच्यासाठी विशेष मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून पाठविण्यात येणार आहे. तत्पुर्वी कोरोना बाधितांच्या मृत्यूला पूर परिस्थिती कारणीभूत असल्याची चाचपणी केली जाणार आहे. त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्यांची नियुक्ती केली आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विशेष मदतीचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.