(चिपळूण)
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौध्द धम्म याबद्दल बेताल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप येथील आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसाठी येथील प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना सोमवारी निवेदन देत निषेध व्यक्त केला.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी व आर. एस. एस.चा सहयोगी नेता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी विश्वरल डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौध्द धम्म याबद्दल बेताल व वादग्रस्त वक्तव्य केल्याने तमाम आंबेडकरी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्यामुळे प्रचंड असंतोष व संताप निर्माण झाला आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयतेच्या विषमतावादी विचारसरणीच्या जोखडातून समतेच्या महामार्गाचा बौद्ध धम्म १९६६ साली आपल्या तमाम अस्पृश्य बंधुभगिनींना देऊन भारत देशामध्ये जी धम्म क्रांती केली. त्यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांची इच्छा नसताना हिंदु धर्माचा त्याग करून बौध्द धर्म स्वीकारला, असे चुकीचे व बेताल वक्तव्य करून रामदास आठवले यांनी बौध्द धरणाच्या अनुयायांच्या भावना बिघडविण्याचे काम केले आहे. त्या विरोधात आंबेडकरी चळवळीच्या सर्व संघटनांच्यावतीने आम्ही रामदास आठवलेना जाहीर निषेध करीत आहोत. यापुढे त्यांनी बौद्ध धम्माबद्दल चुकीच्या पध्दतीने वादग्रस्त वक्तव्य केल्यास सर्व आबेडकरी संघटनाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाव्दारे पदाधिकारी, कार्यकत्यांनी दिला आहे.
यावेळी रिपब्लिकन सेना, बहुजन आघाडी, पिपल्स वंचित रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र आदी संघटनांचे संदेश मोहिते, जयंत जाधव, सुभाष जाधव, मुजफ्फर, उर्फ राजेश मुल्लाजी, प्रा. उमेश पवार, संदीप पवार, राजू जाधव, सागर कदम, वैभव पवार, केतन मोहिते, नाना सावंत, दिलीप पवार, विलास जाधव, सुभाष गमरे, मंदार मोहिते, विनय जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.