(खेड / इक्बाल जमादार)
चोरी, खून, हाणामारी, पोलिसांवरील हल्ला अशा विविध गुन्ह्यात आरोपी असलेला चिपळुणातील अट्टल गुन्हेगार साहिल काळसेकर हा अमरावती जेल मधून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस अलर्ट झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांना नाकीनऊ आणलेला आणि पोलिसांवर हल्ला करणारा हा काळसेकर चिपळूण शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिरलबन मोहल्ल्यात वास्तव्याला होता. तो मूळचा नायशी तालुका चिपळूण येथील आहे. नायशी येथील पाणी कर्मचारी घाग याच्या खुनाच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर त्याने रत्नागिरी येथे पोलीस कॉन्स्टेबल वाजे यांच्यावर जांभा टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते तेव्हाही तो पळाला होता. त्याची वाढती गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला अमरावती येथे कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथे शिक्षा भोगत असताना नुकतेच त्याने पलायन केले असून तो चिपळूणला येण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील पोलीस यंत्रण सज्ज झाली आहे, अशी माहिती मिळत आहे.
साहिल काळशेकर कोणाला आढळला तर त्याने चिपळूण पोलिसाची संपर्क साधावा असे आवाहन ही करण्यात आले आहे.