(चिपळूण)
तालुक्यातील गाणे येथे अवैधरीत्या वृक्षतोड करून जंगलात साठवलेला सुमारे ५४.०५० घनमीटर इतका लाकूडसाठा चिपळूणमधील वन अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. या प्रकरणी जमीन मालकांवर गुन्हाही दाखल केला आहे. ही कारवाई १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
हसमत हसन चिपळूणकर (रा. कळकवणे), विनोद गणपत मोहिते (रा. गाणे) असे गुन्हा दाखल केलेल्या मालकांची नावे आहेत. चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी परिक्षेत्राचे वनपाल परिसरात गस्त घालत असताना गाणे येथे तिवरे रस्त्याच्या बाजूला जंगलात मोठा लाकूडसाठा दिसला. त्याची चौकशी केली असता कोणतीही परवानगी न घेता अवैधरीत्या वृक्षतोड करून हा लाकूडसाठा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ अंतर्गत संबंधित जागा मालकावर गुन्हा दाखल केला. तसेच लाकूडसाठ्याची मोजमापे घेतली.
या ठिकाणी सुमारे ५४,०५० घनमीटर इतका लाकूडसाठा आढळला. हा संपूर्ण लाकूडसाठा वन अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. वन विभागीय अधिकारी दीपक खाडे, सहायक वन संरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी जयश्री कीर, वनपाल दौलत भोसले, वनरक्षक राहुल गुंढे यांनी ही कारवाई केली.