(रत्नागिरी/प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील आगरगाव येथे मद्याच्या नशेत चुलत भावाला मारहाण करुन चालत्या कारमधून ढकलून दिले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अपघाताचा बनाव करणार्या दोन चुलत भावांना न्यायालयाने 7 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 14 सप्टेंबर 2018 रोजी आगरगाव पांढरा आंबा व आगवे उभर्या ठोणा, पुनस या ठिकाणी देवधे ते सापुचेतळे रस्त्यावर घडली. कौस्तुभ रामचंद्र गोरे (34), रोहन भागेश गोरे (24, दोघेही रा. वाडीलिंबू, सापुचेतळे, लांजा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश महम्मद कासीम शेख मुसा शेख यज्ञांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. अनिरुध्द फणसेकर यांनी काम पाहिले.
सविस्तर वृत्त असे की, मयत मनोहर गोरे (26, वाडीलिंबू सापुचेतळे, लांजा) व कौस्तुभ, रोहन हे नात्याने चुलत भाऊ आहेत. 14 सप्टेंबरला तिघेही इको कारने सापुचेतळे लांजा येथे गॅस सिलेंडर आणण्यासाठी गेले होते. त्यांनी लांजा या ठिकाणी दुकानातील माल व गॅस सिलेुंडर घेतला. त्यानंतर लांजा बाजारपेठ येथील दारुच्या दुचकानात गेले. तेथे मद्य प्राशन करुन वाडीलिंबू-सापुचेतळे येथे जात होते. पुनस येथे आले असता सोबत आणलेली बिअरची बाटली मयत मनोहर याने कौस्तुभ व रोहन यांच्या अंगावर ओतली. कौस्तुभला याचा राग आल्याने खाली उतरुन मनोहर याला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा गाडीत बसून घरी निघाले. त्यावेळी मयत मनोहर याने धान्याच्या पिशव्या फोडल्या. याचा राग आल्याने कौस्तुभ याने मनोहर याचे डोके सिलेंडरवर आपटले तसेच आगरगाव येथे आले असता चालत्या कारमधून मनोहर याला बाहेर फेकून दिले.
मनोहरचा चुलत भाउ राहेकश रामचंद्र गोरे (23) हा घटनास्थळी दाखल झाला. रस्त्यावर बेशुध्द पडलेल्या मनोहर याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मनोहर याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र मनोहर याच्या शवविच्छेदनामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला असे म्हटले होते. याप्रकरणी लांजा पोलीस उपनिरीक्षक पंडित पाटील यांनी तक्रार दाखल केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास गावडे यांनी घटनेचा तपास सुरु केला. त्यानुसार पोलिसांनी कौस्तुभ व रोहन याच्याविरुध्द भादविकलम 302, 201, 323 सह 34 नुसार गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान एकूण 14 साक्षीदार सरकारी पक्षाकडून तपासण्यात आले. तर राकेश गोरे हा साक्षीदार फितूर झाल्याचे सरकारी पक्षाकडून घोषित करण्यात आले. निकाल देताना न्यायालयाने कौस्तुभ व रोहन याला खुनाच्या गुन्हयाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्हयामध्ये दोषी असल्याचा निकाल देत 7 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा दोघांना सुनावली.