जाकादेवी /वार्ताहर:- रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन तसेच शैक्षणिक-सामाजिक- राजकीय-कला-क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक संपादन केलेले कै. दिलीप उर्फ नानासाहेब मयेकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन शनिवार दि.२ ऑक्टोबर रोजी मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदरचा श्रद्धांजलीपर पुण्यस्मरण कार्यक्रम मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी कै. डॉ. नानासाहेब मयेकर यांचे मित्र-मंडळ, मयेकर कुटुंबीयांचे हितचिंतक, तसेच मोहिनी मुरारी शिक्षण संस्था तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संस्थेच्या विविध विद्याशाखांमधील मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या श्रद्धांजलीपर पुण्यस्मरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. डॉ. नानासाहेब मयेकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक, राजकीय ,कला-क्रीडा या क्षेत्रातही लौकिक संपादन केला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी चाफे या ठिकाणी मोठ्या धाडसाने शाळा- महाविद्यालय उभे केले. शिवाय त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच कला-क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातही यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.
राष्ट्रीय,राज्यस्तर, जिल्हा व तालुका पातळीवर त्यांनी विविध स्पर्धा व समाजपयोगी उपक्रम राबवून क्रीडा,कला सांस्कृतिक क्षेत्राला गती दिली.त्यांनी आयुष्यभर विधायक-लोकोपयोगी उपक्रमांना आपलेसे केले.सामुहिक जीवन आपले मानून त्यांनी अडल्या-नडल्यांना प्रसंगात सढळहस्ते मदतीचा हात दिला.अनेक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना नानासाहेबांनी मोफत शिक्षण दिले.नानांच्या या धाडसी व सेवाभावी कामात नानांचे मोठे बंधू सुनिल मयेकर यांचे तसेच नानांची पत्नी दिप्ती (नानी) व संपूर्ण मयेकर कुटुंबियांची साथ नानासाहेब यांना लाभली. डॉ. नानासाहेब मयेकर यांचे शिक्षणावर प्रचंड प्रेम होते. गुहागर तालुक्यातील काजुर्ली याठिकाणी कायमस्वरूपी सुसज्ज अशी शालेय इमारत बांधून तेथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची उत्तम सोय व्हावी, यासाठी मालगुंड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नानांनी काजुर्ली शाळेला मान्यता मिळवून दिली. काजुर्लीत सर्व सुविधांयुक्त हायस्कूल साकारण्याची त्यांची संकल्पना होती. गतवर्षी नानांचे दुःखद निधन झाल्याने नानांची काजुर्लीतील विद्यालयाची संकल्पना मयेकर कुटुंबीयांनी काजुर्ली येथे विद्यालयाची नवीन सुसज्ज शालेय इमारत बांधून पूर्णत्वास नेली. आज काजुर्ली येथे डॉ.नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली या नावाने विद्यालय सुरू झाले आहे. या विद्यालयामुळे काजुर्लीतील विद्यार्थी -पालक-ग्रामस्थ वर्ग यांच्यात कमालीचे चैतन्य निर्माण झाले आहे. याकामी काजुर्लीतील दानशूर ग्रामस्थांनी खूप मोठे योगदान दिले आहे.
३० नोव्हेंबर रोजी राज्याचे मंत्री महोदय यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचा नामकरण सोहळा व काजुर्ली विद्यालयाचा अधिकृत उद्घाटन समारंभ होणार आहे. एकूणच डॉ. नानासाहेब मयेकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणासाठी तसेच विधायक उपक्रमासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. अनेक क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून देऊन उल्लेखनीय काम केल्याने कै.नानासाहेबांचे कार्य अजरामर राहिले आहे. त्यांच्या उत्तुंग कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, नानांच्या त्यागी व निष्ठापूर्वक कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, यासाठी बंधू मयेकर व मयेकर कुटुंबीयांनी यापूर्वीच नानांसाहेबांच्या आठवणी ही प्रेरणादायी स्मरणिका प्रकाशित केली आहे.त्यामध्ये नानांचे विविध आदर्श पैलू अनेक लेखकांनी आपल्या लेखातून प्रकट केले आहेत.
२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०वा. चाफे येथे आयोजित करण्यात आलेल्या कै. नानासाहेब यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला डॉ. नानासाहेब मयेकर याचे मित्र मंडळ, मोहिनी मुरारी शिक्षण संस्था, मालगुंड एज्युकेशन सोसायटी तसेच शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे हितचिंतक , शिक्षणप्रेमी नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेने केले आहे.