(रत्नागिरी/प्रतिनिधी)
गौरी-गणपतीचा सण साजरा करून विसर्जन होताच अनेक चाकरमानी परतीसाठी निघाले आहेत. कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी भाविकांना घाई आहे. सोमवारी गणेश विसर्जन झाल्याने सायंकाळी मिळेल त्या गाडीने मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. रेल्वे, खासगी गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली असून राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे सोमवारी १६५ जादा एसटी मुंबईकडे रवाना झाल्या. तर काल ६ सप्टेंबर रोजी सर्वाधिक गाड्या सुटल्या असून जिल्ह्यातून ६३० गाड्या मुंबई मार्गावर धावल्या आहेत.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सलग दोन वर्ष असलेले कोरोना निर्बंध यावर्षी नसल्याने भाविक मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी गावाकडे आले होते. मुंबई व उपनगरातून जिल्ह्यात १८२५ जादा गाड्या आल्या होत्या. मुंबईकरांना घेवून आलेल्या एसटी बसेस प्रत्येक आगारात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव साजरा करून सोमवारपासूनच परतीसाठी एसटीच्या गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंडणगड आगारातून ७, दापोली ५६, खेड २५, चिपळूण २८, गुहागर ८, देवरूख १७, रत्नागिरी १७, लांजा ६, राजापूर आगारातून एक एसटी अशा मिळून एकूण १६५ गाड्या सोमवारी सायंकाळनंतर मुंबईकडे रवाना झाल्या.
अनंत चतुर्दशी दि. ९ सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे रविवार दि. ११ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले. आज दि. ७ रोजी ३५० गाड्यांचे नियोजन आहे. दि. ११ पर्यंत या जादा गाड्या सुटणार असून प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ७५० गाड्यांचे ग्रुप बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय दैनंदिन १०० गाड्या मुंबई मार्गावर धावत आहेत.