(रत्नागिरी)
मिऱ्या नागपूर मार्गावरील चांदसूर्या येथील वळणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जंगलतोड सुरू आहे. चांदसूर्या परिसर हा घनदाट जंगल असणारा व डोगराळ भाग म्हणुन ओळखला जातो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लहान मोठी झाडे होती. त्याचप्रमाणे अनेक वनौषधी झाडेही देखील होती. बाहेरील मोठे व्यापारी कोट्यावधी रुपयाची संपंत्ती स्थानिकांकडून विकत घेऊन मालामाल होत असल्याचे चित्र आहे. या व्यापाऱ्यांकडून मात्र या वनौषधी झाडाबरोबरच सर्वच झाडांची खुलेआम कत्तल सुरू आहे. जंगल भागाने व्यापलेला पूर्ण डोंगरच बोडका झाल्याने सबंधित विभागाचे कर्मचारी वनक्षेत्राची राखण करतात की झोपा काढतात! अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
रत्नागिरीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या बाजूलाच खुलेआम जंगतोड सुरू असल्याने पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. अत्याधुनिक कटर मशिन व जेसीबीच्या मदतीने रात्रंदिवस सुरू असलेल्या या वृक्षतोडीकडे वनविभागाने कानाडोळा केला. त्यामुळे या भागाची वाटचाल उजाड होण्याकडे सुरू झाली आहे. या व्यवसायातील भरमसाट कमाईमुळे गावोगावी तयार झालेल्या लाकूडतोड्यांच्या टोळ्या हळूहळू वाढत आहेत.
पावसाळ्यात सौंदर्याने नटलेले येथील डोंगर आता उघडे बोडके दिसत आहेत. दिवसागणिक वाढत चाललेली जंगलतोड करवंद, जांभूळ, चिंच, अळू, अटुर्ली, रायवळ आंबे अशा रानमेव्याच्या मुळावर आली आहे. पक्षांना घरटी बांधण्यासाठी सुरक्षित झाडे मिळत नाही. त्यांची निवासस्थाने नष्ट झाली आहेत. जंगली श्वापद गावातील वस्तीकडे वळत आहेत. डिसेंबर महिन्यातच याआधी कधी जाणवला नव्हता एवढा आता उन्हाळा आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी बेसुमार वृक्षतोड हायवे लगत होत असून देखील गप्प का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
बेसुमार जंगलतोड सुरू असून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या वृक्षतोडीने वनसंपदेने नटलेल्या निसर्गाचा परिसरात ऱ्हास होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. जंगलातील रानमेवा, औषधी वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. संबंधित खाते हे सारे डोळ्यावर पट्टी ओढून दृष्टीआड करीत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.