(ज्ञान भांडार)
चष्मा ही आजकाल सर्वांसाठी कॉमन गोष्ट झाली आहे. लहान मुलांनाही कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक घरात चष्म्याचा नियमितपणे वापर करणारी एक तरी व्यक्ती नक्कीच आढळून येते. अनेकवेळा आपला चष्मा खूप लवकर खराब होतो. कारण चष्मा स्वच्छ करताना नकळत आपल्या काही चुका होतात. चष्मा स्वच्छ करणं हे काही मंडळींचं एक नित्याचं काम असते. पण वर्षानुवर्षे चष्मा वापरूनही नकळत काही चुका होऊन जातात आणि मग काचेवर ओरखडे पडून चष्मा लवकरच खराब होऊन जातो. असं होऊ नये म्हणून चष्मा स्वच्छ करण्यासाठी या काही गोष्टी करून बघा. आणि काचांवर स्क्रॅचेस पडले म्हणून चष्मा बदलण्याचा विचार सोडून द्या. खाली दिलेल्या सोप्या उपायांचा वापर करून आपण ते ओरखडे घालवू शकतो.
चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस घालवण्याचे उपाय
- चष्मा स्वच्छ करण्यासाठी कधीही काेरडा कपडा वापरू नका. तसेच कॉटन किंवा होजियरी सोडून इतर कोणत्याही कपड्याने चष्मा स्वच्छ करू नका. अर्थातच हे दोन्ही कपडेही ओलसरच असावेत.
- घरातली टुथपेस्ट एक मऊ कपड्यावर घेऊन चष्म्यावर जिथे ओरखडे आहेत तिथे ती हळूहळू लावून हलकेच घासा. काही वेळानंतर ओरखडे पुसट झालेले दिसतील.
- थोडा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून तो काचेवरील ओरखड्याना लावा. काही वेळानंतर ओरखडे दिसणार नाहीत.
- विंडशीट वॉटर रीपेलंट जे कारच्या काचा साफ करण्यासाठी वापरले जाते त्याचा उपयोग चष्म्याच्या काचा साफ करण्यासाठी होऊ शकतो.
- चष्मा काही वेळासाठी फ्रीजर मध्ये ठेवा. त्यामुळे काचांवर बर्फ जमा होईल आणि नंतर हळूहळू तो बर्फ काढा, ओरखडे दिसेनासे होतील.
- रोज रात्री झोपताना जेव्हा चष्मा काढाल तेव्हा तो १५ ते २० सेकंदासाठी नळाखाली धरा. त्यानंतर तो न पुसता तसाच उभा ठेवून द्या. सकाळी ओलसर कपड्याने चष्मा पुसून घ्या. काचा स्वच्छ-चकचकीत होईल.
- व्हाईट व्हिनेगर वापरूनही चष्मा स्वच्छ करता येतो. यासाठी एक वाटी पाणी घ्या. त्यात दोन टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. ते चष्म्यावर स्प्रे करून मग ओल्या कपड्याने पुसून घ्या.