(मुंबई)
दोन दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याने संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे राज्यभरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी गिरीश महाजन यांनी निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत अशी माहिती दिली. वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आंदोलन करण्यापूर्वी मला भेटा असे मी सांगितले होते. आधी भेट झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. वसतिगृहांसाठी ५०० कोटींचा निधी केंद्राकडे मागितला आहे. तसेच दोन दिवसांत १ हजार ४३२ पदे भरली जाणार आहेत. भरतीचा प्रस्ताव या आधीच होता. त्याला गती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांच्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स (मार्ड) या संघटनेने मागील दोन दिवसांपासून संप पुकारला होता. या संपात राज्यभरातील डॉक्टर सहभागी झाल्याने रुग्णांचे हाल तसेच बाह्य रुग्ण सेवा पूर्ण कोलमडली होती. मात्र आता राज्यातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे.
राज्य शासनाने ज्येष्ठ निवासी डॉक्टरांसाठी १४३२ पदांची निर्मिती करावी, निवासी डॉक्टरांसह वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहांची दुरवस्था तातडीने दुरुस्त करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. निवासी डॉक्टरांनाही सातव्या वेतन आयोगाप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करण्यात यावी तसेच कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी बजावलेल्या वैद्यकीय सेवेचा थकबाकी मोबदला तातडीने देण्यात यावा, अशा मागण्यांसाठी मार्डकडून संप पुकारण्यात आला होता.