रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी रत्नागिरीकर रसिकांसाठी वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘मुक्तसंध्या’ या कार्यक्रमात, मराठी सिनेनाट्य सृष्टीतील लोकमान्य, रसिकप्रिय अभिनेते श्री. भरत जाधव यांच्या दिलखुलास गप्पागोष्टीमय मुलाखतीतून त्यांची बहुढंगी कलाकारकीर्द अलवारपणे उलगडली गेली. पावसाइतकीच रसिकांचीही जोरदार उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. रत्नागिरी येथे ‘पुन्हा सही रे सही ‘ या नाटक दौऱ्यावर असताना रसिकांना भरत जाधव यांच्यासोबतच्या सहवास-संवादाचा लाभ घेता आला. ही मुलाखत लेखिका- निवेदिका-अभिनेत्री सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी घेतली.लाॅकडाऊन नंतरच्या चतुरंग प्रतिष्ठानच्या या पहिल्याच ऑफलाईन कार्यक्रमाला रत्नागिरीकर प्रेक्षक-श्रोत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी आवर्जून भरभरून उपस्थिती दर्शवली.
कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय एक यशस्वी अभिनेता होऊन मराठी नाटक तसेच चित्रपटांत आपला वेगळाच ठसा उमटवणा-या भरत जाधव यांचा, रंगमंच आणि रूपेरी पडद्यावरचा अनेक चढउतारांचा, प्रेरणादायी जिद्दीचा अथक प्रवास या मुलाखतीत रसिकांना जाणून घेता आला.
मुळात काॕलेजमधे प्रवेश हा एकांकिका करण्यासाठी घेतला असं भरत जाधव सांगतात. यावरून त्यांची कलाकार म्हणून असलेली तळमळ अधोरेखित होते. याच तळमळीतून जिद्द आणि अथक प्रयत्न या दोन चिवट पंखांनी उंच भरारी घेणाऱ्या भरत जाधव यांची पुढच्या यशस्वी वाटचालीतील दोन लोकप्रिय नाटकं म्हणजे ‘आॅल दी बेस्ट’ आणि ‘सही रे सही’ !! ‘आॅल दी बेस्ट’ या नाटकाचे एका वर्षात ४३३ प्रयोग झाले आणि ते ‘लिम्का रेकाॅर्ड बुक’मधेही झळकले. त्यांच्या ‘सही रे सही’ या नाटकाने त्याही पुढच्या रेकॉर्डचा टप्पा गाठला आणि एका वर्षात ५६७ प्रयोग केले. पुढे याच नाटकाने तीन हजाराचाही टप्पा ओलांडला. या दोन नाटकांविषयी त्यांनी या मुलाखतीत भरभरून सांगितले. हा माहितीचा टप्पा अधिक खुलला असावा कारण मुलाखत घेणाऱ्या सौ. संपदा या त्यांच्या ‘ऑल दी बेस्ट’ नाटकातील प्रारंभीच्या एक सहकलाकारच होत्या !
‘अधांतर’ या जयंत पवार यांच्या नाटकात काम केल्यानंतर प्रद्युम्न कुलकर्णी यांच्या ‘प्रपंच’ या सिरीयलमधे देखील अभिनेते भरत जाधव यांनी काम केलं आहे. दादा कोंडकेंसारख्या विनोदाच्या बादशहाची शाब्बासकीची थाप त्यांना लाभली होती. तसेच पु. ल. देशपांडे यांची ‘पोरंं वाघ मागे लागल्यासारखी प्रयोग करतायत’ ही प्रशस्ती देखील त्यांच्याकरिता खूप महत्वाची ठरली होती. त्यांचा पहीला चित्रपट ‘चालू नवरा भोळी बायको’ हा होता. त्याचबरोबर ‘पछाडलेला’ हा त्यांचा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला. ‘जत्रा’ या चित्रपटाचा प्रभाव अजूनदेखील प्रेक्षकांवर असल्याचे भरत जाधव आजही नमूद करतात. त्यांच्या ६ ते ७ चित्रपटांची सिल्व्हर ज्युबिली झालेली असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नव्हता.
‘शिक्षणाच्या आईचा घो’ , ‘वन रूम किचन’, ‘क्षणभर विश्रांती’ ‘ बकुळा नामदेव घोटाळे’ या उत्तम भूमिका असलेले हे चित्रपट त्यांच्या आवडीचे आहेत असं ते सांगतात. ‘ढॅण्टढॅण’ या व्यावसायिक नाटकाबरोबर ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे नाटक देखील लोकप्रिय झाल्याचं ते कौतुकाने सांगतात.
आपल्या सहकलाकारांची अडचण लक्षात घेता अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःच्या ‘व्हॅनिटी बस’ची सोय सहकलाकारांसाठी उपलब्ध करून दिली.
अशी अभिमानास्पद उपलब्धी करून देणारे ते बहुधा पहिले मराठी कलाकार असावेत ! त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या ‘भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची देखील निर्मिती केली आहे.
चित्रपटसृष्टीत काम करत असताना अंकुश चौधरी , केदार शिंदे , सुधीर भट यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी त्यांच्या आयुष्यात मोलाचं मार्गदर्शन केलं आणि ही तिन्ही व्यक्तिमत्त्व त्यांच्या आवडीची आहेत असते अभिमानाने सांगतात.
एक कलाकार म्हणून कितीही मोठेपणा लाभला तरी माणूस म्हणून जमिनीवरच राहणं ते पसंत करतात आणि प्रत्यक्षात तसे वागतातही !! आतापर्यंत शंभरापेक्षाही जास्त चित्रपटांत काम केलेल्या या कलावंताने लाॅकडाऊनच्या काळात आपल्या जमिनीत केशर-आंबा लागवड करून स्वतःचं फार्महाऊस देखील तयार केलं आहे. ‘एक कलाकार’ म्हणून आलेले अत्यंत हृद्य तसेच कटू-गोड अनुभव त्यांनी प्रांजळपणे या ‘मुक्तसंध्ये’त मुक्तपणे सांगितले.
मराठी चित्रपट सृष्टीत नांव कमावण्याचं स्वप्न बाळगण्यापासून ते मराठी कलासृष्टीतल्या मराठी कलाकारानं सर्वांत महागडी गाडी घेण्यापर्यंतची आपली स्वप्न त्यांनी अफाट कष्ट करत करत साकार करुन दाखवली.
या ‘मुक्तसंध्ये’च्या संवादिका अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी आणि कलाकार भरत जाधव यांनी ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘ऑल दी बेस्ट’ यांसह बरेचदा कलासृष्टीत एकत्र काम केलेलं आहे. केवळ चारच दिवसांच्या अल्पावधीत सुनिश्चित केलेल्या या कार्यक्रमातील या दोन्ही कलाकारांचे स्वागत रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॕड. दीपक पटवर्धन यांनी केले. चतुरंग कार्यकर्ती राधा सोहोनी हिने कार्यक्रमाची प्रस्तावना अतिशय सुविहितपणे केली तर चतुरंगी आर्या वंडकर हिने सर्वांप्रती कृतज्ञतेची भावना समर्थपणे व्यक्त केली.
भर डिसेंबर महिन्यात अवचित उद्भवलेल्या जोरदार पावसासारखीच, अगदी आकस्मिकपणे हाती आलेली ही चतुरंग मुक्तसंध्या, भरत-संपदा यांच्या प्रसन्न सहभागाने उपस्थितांना आल्हाददायी आनंदाचा शिडकावा देऊन गेली.