“तौक्ते” चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून सर्व बाधितांना मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने काम करावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले. त्यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.
या चक्रीवादळामुळे अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. या सर्व गावांना अधिक काळ अंधारात रहावे लागू नये यासाठी अधिकच्या टिम कामाला लावून लवकरात लवकर येथील विद्युत पुरवठा सुरळीत करावा असे सांगून पालकमंत्री म्हणाले की जोवर विद्युतपुरवठा सुरळीत होत नाही तोवर लोकांना अंधारात राहावे लागू नये म्हणून केरोसीन वाटपाची व्यवस्था तसेच पर्यायी विद्युत उपकरणांची व्यवस्था प्रशासनाने करावी.
विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे शक्य नाही या स्थितीत त्याठिकाणी टँकरद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी या वेळी दिले.
अनेक घरांची पडझड झाली आहे तसेच काही घरांची पत्रे आणि कौलं उडून गेली आहेत अशा ठिकाणी पत्रे उपलब्ध होण्यास उशीर लागू शकतो हे लक्षात घेऊन तातडीने ताडपत्री देण्याची व्यवस्था करावी पडझड झालेल्या घरांचे पंचनामे ही गतिमान पद्धतीने पूर्ण करावेत असे ते म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळानंतर ज्या पद्धतीने बाधितांना मदतीचे वाटप झाले आहे त्याच पद्धतीने याहीवर्षी बाधित झालेल्या लोकांना आर्थिक मदत पुरवण्याबाबत आपण मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे असे ते म्हणाले,यासाठी पंचनामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे योग्य मदतीची मागणी देखील आपणास करता आली पाहिजे याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
चक्रीवादळात झालेल्या पावसाळामुळे साथरोग पसरु नये यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव असल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबतची पूर्वतयारी मोठ्या प्रमाणावर केली त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे प्रमाण खूप कमी आहे याबाबत त्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार श्री. विनायक राऊत, राजापूर- लांजाचे आमदार श्री. राजन साळवी, चिपळूणचे आमदार श्री. शेखर निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. उदय बने, जिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा व संबंधित अधिकारी उपस्थित होते.