तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला सर्वाधिक तडाखा दिला आहे. वेगवान वार्यांमुळे घरा, गोठ्यांसह विविध वास्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या 106 शाळांची पडझड झाली असून 51 लाख 23 हजार 3 रुपयांचे नुकसान झाले आहे.
रविवारी (ता. 16) सकाळी तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात प्रवेश केला. ताशी 50 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. वादळाचा केंद्रबिंदू किनार्यापासून दीडशे ते दोनशे किलोमीटर खोल समुद्रात होता. वेगवान वार्याच्या तडाख्यात सापडलेली कच्ची घरे, छतावरील पत्रे, कौले उडून गेली. याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना फटका बसला आहे. दापेाली, चिपळूण आणि राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शाळांची कौले उडून गेली. वर्गखोल्यांच्या मधील पत्रे झाडे पडून फुटून गेले. फुटलेल्या छपरातून आलेले पाणी वर्गावर्गात साचून राहीले होते. सुट्ट्या सुरु असल्याने शालेय कामकाज बंद आहे; परंतु पावसाचे पाणी साचल्याने काही शाळांमधील पुस्तके व अन्य साहित्य भिजून गेले आहे. यामध्ये 51 लाखांचे नुकसान झाले आहे.
मागीलवेळी निसर्ग चक्रीवादळात दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यातील शाळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी दुरुस्तीसाठी निधी अपुरा आला होता. आता नव्याने तौक्ते वादळाची भर पडली आहे. यामध्ये नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष केव्हा सुरु होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्ष शाळा सुरु होण्यापुर्वी ही दुरुस्त होणे अपेक्षित आहे.