रत्नागिरी : इमर्जन्सी वैद्यकीय सेवा समजल्या जाणार्या ‘108’ या रुग्णवाहिकेत मागील 8 वर्षात चक्क 474 बालकांचा जन्म झाला आहे. जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण आणि दुर्गम भागात ही सेवा पोहोचत असल्याने जिल्ह्यासाठी 108 रुग्णवाहिका वरदानच ठरत आहे.
राष्ट्रीय आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनेंतर्गत सन 2014 पासून ही सेवा जिल्ह्यात सुरू झाली. महामार्ग असो वा कोणतेही ठिकाण 108 या क्रमांकावर फोन करताच अवघ्या 20 ते 30 मिनिटात ही रुग्णवाहिका वैद्यकीय उपचार पथकासह रुग्णांच्या दारात हजर होते. ही रुग्णवाहिका कृत्रिम श्वसन यंत्रणा, शॉक मशिन, प्राणवायूचे सिलेंडर, मॉनिटर आणि वैद्यकीय पथक यासह सज्ज असते. 108 या क्रमांकाला रुग्णांनी तसेच गरजू नातेवाईकांनी दूरध्वनी केल्यास संबंधिताच्या ठिकाणची माहिती घेऊन ही रुग्णवाहिका तेथे जाते व रुग्णावर तातडीने मोफत उपचार सुरु केले जातात. संबंधित रुग्णाला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गरज असल्यास जिल्हा रुग्णालयात पोहोचवले जाते.
अपघातानंतर लगेचच आवश्यक ते प्राथमिक उपचार मिळाल्याने हजारोंचेे प्राण वाचले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला ‘गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ‘108’ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून, जिल्ह्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे.
गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत आलेल्या हजारो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे. महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली ही रुग्णवाहिका रुग्णांना संजीवनी देणारी योजना आहे. प्रसूतीच्या वेळी ही सुविधा जीवनदायी ठरली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ वर्षात 474 बालकांनी या रुग्णवाहिकेतच जन्म घेतला आहे. गतआठवड्यात तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथील एका महिलेला पहाटे 3 वाजता प्रसुती वेदना सुरू झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका मागवली. केवळ 20 मिनिटातच रुग्णवाहिका त्यांच्यापर्यंत पोहचली. त्या महिलेला घेऊन रुग्णालयात येत असतानाच प्रसुतीकळा वाढल्या. त्यामुळे रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका थांबवून तिची प्रसुती करण्यात आली. त्या महिलेने मुलीला जन्म दिला. डॉ. विद्या वाघमारे आणि सहाय्यक रोहन मायनाक यांनी तिची प्रसुती सुखरूपणे पार पाडली.
या योजनेंतर्गत हृदय विकाराचा धक्का, पोटाचे विकार, सर्पदंश, पक्षाघात, विषबाधा, तातडीच्या कुठल्याही आपतकालीन वैद्यकीय सेवेच्या मदतीसाठी रुग्णांनी अथवा नातेवाईकांनी केवळ 108 या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी केल्यास प्रशिक्षित वैद्यकीय पथक आणि औषधांसह ही रुग्णवाहिका रुग्णाच्या घरी अवघ्या 20 ते 30 मिनिटात पोहचते आणि संबंधितावर उपचार सुरु करते. हे उपचार मोफत स्वरुपात केले जातात.
वर्षनिहाय रुग्णवाहिकेत जन्मलेली बालके
▪️ 2014………..14
▪️ 2015…………44
▪️ 2016………….48
▪️ 2017…………..76
▪️ 2018…………..228
▪️ 2019……………40
▪️ 2020…………….16
▪️ 2021……………..07
▪️ 022……………..01