(बंगळुरू)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान ३ मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला. भारताच्या या तिस-या चंद्र मोहिमेला आलेले हे पहिले यश आहे. चांद्रयान ३ ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही छायाचित्रे घेतली आहेत.
भारताच्या चांद्रयान-३ ने अखेर चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. बंगळुरू येथून इस्रोने दिलेल्या कमांडप्रमाणे चांद्रयान-३ ने चंद्राचे फोटो घेतले आहेत. शनिवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि ती यशस्वी झाल्याचे इस्रोने म्हटले आहे. यादरम्यान चंद्राजवळ प्रदक्षिणा घालताना अंतराळ यानात बसवण्यात आलेल्या कॅमे-याने चंद्राचा व्हीडिओ बनवला आहे. इस्रोने ट्विटरवर चंद्राची ही पहिली झलक शेअर केली आहे.
चांद्रयान-३ मिशन १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर यान पृथ्वीच्या पाच फे-या घेऊन चंद्राकडे रवाना झाले. चांद्रयान-३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश पूर्ण केल्यामुळे शनिवार हा मोहिमेसाठी महत्त्वाचा दिवस होता. कारण इस्रोने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चंद्रावरील पृष्ठभाग स्पष्ट दिसत आहे. आता चांद्रयान-३ चा चंद्राच्या भूमीवर लँड होण्याचा प्रवास सुरू झाला आहे.
आता २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर अमेरिका, रशिया, चीननंतर भारत हा चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान-३ हे १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावले आहे.
चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्याने मैलाचा दगड पार पडला आहे, त्यामुळे इस्रोच्या कामगिरीत आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास चांद्रयानाचे आणखी २ टप्पे असतील. येत्या १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होईल आणि २३ ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. जेव्हा चांद्रयान-३ लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल, असे सांगण्यात आले.