(चंद्रपूर)
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यापूर्वी त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर एम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचाराला प्रतिसाद देत असल्याच्या बातम्या काल दिवसभर येत होत्या. त्यामुळे ते सुखरूप परत येतील, अशी सर्वांना आशा होती. मात्र रात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी एयर अॅम्बुलन्सद्वारे त्यांचं पार्थिव आणण्यात येईल. खासदार बाळू धानोकर यांच्या पार्थिवावर वरोरा येथे उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तींनी कळवले आहे.
२०१४ ला ते आमदार असताना त्यांच्यावर स्थुलतेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही पत्थ्य पाळावे लागतात. आतड्यामध्ये गुंतागुंत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण समोर येत आहे. नागपुरात शुक्रवारपासून ते भरती होते. शनिवारी किडनी स्टोनचे ऑपरेशन झाले. त्यानंतर आतड्यात इंफेक्शन असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.
पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले. दुसरीकडे, एक युवा नेता अकाली गेल्याने राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या संघटन कौशल्य आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी विजय खेचून आणला होता. त्यांच्या रूपाने काँग्रेसला महाराष्ट्रात खाते उघडता आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.