(मुंबई)
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्यातच पिंपरी-चिंचवड येथे पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर हा मुद्दा अधिकच पेटला होता. मात्र, आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे आणि ज्यांना अटक केली, त्यांची मुक्तता करावी, असे आवाहन केले.
एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. मी पुन्हा एकदा या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो. माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे, त्यांची मुक्तता करावी, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ज्या पोलिस अधिका-यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, ती मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी सूचना मी करतो.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उध्दारकर्ते, महात्मा जोतिबा फुले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे, असेही मंत्री पाटील यांनी अधोरेखित केले.
महापुरुषांच्या कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाला, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. “त्या” शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेशदायक ठरल्या आहेत. शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत, याचे वाईट वाटत आहे. या मुद्यावरून महाराष्ट्र अशांत होऊ नये, असे मला वाटते, असे पाटील यांनी म्हटले.
माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली, त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा, ही विनंती, असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.