(सोलापूर)
सोलापुरच्या पालकमंत्री पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील हे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तर या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली. यावेळी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्याने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील हे पुढील दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर हा शाईफेकीचा प्रयत्न करण्यात आला. तर यावेळी कंत्राटी भरती विरोधात या पदाधिकाऱ्याने घोषणाबाजी देखील केली. तर काळे झेंडे दाखवण्याचा देखील प्रयत्न केला. चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेमध्ये स्वतः पोलिस अधीक्षकांचीही उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील येणार म्हणून याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पण त्यामधून या पदाधिकाऱ्याने पुढे जात शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. शाई फेकल्यानंतर सदरील भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज्य शासनाने सरकारी नोकरीमध्ये सुरु केलेल्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्याने हे पाऊल उचललं.
दरम्यान, याआधी पुण्यातही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये फेस शिल्ड लावून हजेरी लावली. आता रविवारी पुन्हा त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला.