(खेड / भरत निकम)
लोटे घाणेखूंट येथील मोबाईल शाॅपी फोडून चोरट्यांनी १ लाख ३० हजारांचा माल लंपास केला आहे. खेड शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांनी अनेक घरफोड्या आणि दुकाने फोडून धूमाकूळ घातलेला आहे. चोऱ्यांचे सत्र सध्या सुरुच असून या चोरांना पोलिस कारवाई होण्याची भीती राहिली नाही.
मुंबई गोवा महामार्गावरील लोटे घाणेखूंट येथील साई एंटरप्रायजेस नामक दुकानाचे मालक दीनेश लक्ष्मण कदम यांंचे दुकान अज्ञात चोरांनी रात्री फोडून आतील मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. यामध्ये लॅपटॉप, ४ मोबाईल, सोन्याची रिंग, स्मार्ट वाॅच, एअर बड, ब्ल्यू टूथ, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, इअर फोनसह अन्य मोबाइलची असेसरी असा एकूण १ लाख ३० हजार किंमतीचा ऐवज चोरांनी लांबवलेला आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला असून तपास सुरु केलेला आहे.
दरम्यान, खेड शहरात अनेक बंद घरे फोडून घरातील मौल्यवान वस्तू आणि सोन्याचे दागिने लंपास केले. त्याशिवाय काही दुकाने फोडली असून दुकानातून मौल्यवान वस्तू आणि रोकड सुध्दा चोरुन नेली आहे. या चोरांना पोलीस प्रशासन यांची भिती राहिलेली नसून ते बिनधास्तपणे रात्रीच्या अंधारात घरे आणि दुकाने फोडत आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त शहरासह ग्रामीण भागात वाढवावी, अशी मागणी भयभीत झालेल्या नागरिकांनी केली आहे.