( खेड / इक्बाल जमादार)
दोन दिवस कोसळत असलेल्या पावसाने आज खेड येथे एक विचित्र घटना घडली. अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यातील दाभीळ येथे एका घरावर दरड कोसळली आणि दरडीखाली सापडले घर आणि घराखाली सापडली कार अशी विचित्र घटना घडली आहे. यात दरडीखाली सापडलेल्या कारचा चक्काचूर झाला आहे. कारचे लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच दुचाकीही याखाली अडकल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेतून युवती बचावली.
दाभीळ येथील संतोष राठोड यांच्या मालकीचे असलेल्या घरावर दुपारच्या सुमारास अचानक घरानजीक असलेली दरड कोसळून घर या दरडी गाडले गेले. त्यामध्ये घरासमोर उभी असलेली एक कार व दुचाकी दरडीखाली अडकून लाखोंचे नुकसान झाले. या घरामध्ये असलेली २० वर्षीय युवती स्नेहा राठोड हिने दरड कोसळत असल्याचे लक्षात येताच घरा बाहेर धाव घेतल्याने तिचा जीव वाचला.
दरम्यान, या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र घर दरडी मध्ये पूर्णतः उदध्वस्त झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. राठोड कुटुंबीय बेघर झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटना स्थळी दाखल होत मदत कार्य केले. सांयकाळी उशिरापर्यत हे मदत कार्य सुरु होते.