(संगमेश्वर / प्रतिनिधी)
घरबसल्या कमवू शकता…अशा आमिषाची जाहिरात ॲपवर देऊन महिलेला भामट्याने दोन लाखाहून अधिकचा ऑनलाईन गंडा घातला. या प्रकरणी एकावर देवरूख (ता. संगमेश्वर) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मोनिका रेड्डी असे त्या संशयिताचे आहे. हा प्रकार २३ ते २६ जुलै या दरम्यान देवरूख येथे घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी ऑनलाईन काम करत होती. त्यावेळी तिच्या फेसबुक ॲपवर ऑनलाईन नोकरीची लिंक आली. फिर्यादीने त्यावर क्लिक केले. तशी सीमाराणी नावाची व्हॉटअप् प्रोफाईल ओपन झाली. त्यावर घरबसल्या काही मिनिटात पैसे कमवू शकता, अशी जाहिरात होती. फिर्यादींना ती खरी वाटल्याने त्यांनी त्यावर संपर्क केला. त्यावर मोनिका रेड्डी नावाचे एक चॅनल सुरू झाले. समोरच्या व्यक्तीने सांगितल्यानुसार फिर्यादींना व्यवसायाच्या आधारे मोठा नफा मिळवून देण्याची हमी दिली गेली.
त्यानंतर त्यांना काही प्रश्न सोडविण्यास सांगितले. त्या त्या वेळी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने दोन लाख ३ हजार ७३४ रूपये ऑनलाईन भरून घेतले. मात्र फिर्यादींना कोणतेही कमिशन अथवा जमा केलेली रक्कम परत केली नाही. याबाबत फिर्यांनी देवरूख पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित मोनिका रेड्डी हिच्यावर गुन्हा दाखल केला.