(मुंबई)
मुंबईमधील डोंबिवलीत एका घटनेत पतीने त्याची पत्नी आणि दोन मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत या तिघीही गंभीर भाजल्या. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या तिघींचाही मृत्यू झाला. प्रसाद पाटील असं या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याने या घटनेनंतर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या घराला आग लागली होती आणि त्यात आगीत या तिघी भाजल्या असा बनाव रचला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर ही सगळी माहिती समोर आली. प्रसादने त्याची पत्नी प्रीती आणि मुली समीरा आणि समीक्षा यांना जाळलं असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी प्रसाद पाटीलच्या विरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. डोंबिवलीतल्या भोपर या ठिकाणी प्रसाद पाटील त्याच्या पत्नीसह आणि दोन मुलींसह राहात होता. मात्र तो नेहमी त्याच्या पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होता. पत्नी प्रीतीला तो अनेकदा मारहाणही करत असे. मृत्यू प्रकरणी फिर्यादी किशोर पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी प्रसादच्या विरोधात ३०२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रसाद पाटीलवरही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपासही करत आहेत.
गंभीर भाजलेल्या प्रीती, समीरा आणि समीक्षा या तिघींना रूग्णालयात दाखल केलं गेले. मात्र उपचारादरम्यान रविवारी सकाळी या तिघींचाही मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी मानपाडा पोलीस करत होते. त्यांना प्रसाद पाटीलवर संशय आला होता. यानेच हे कृत्य केलं असावं असं पोलिसांना वाटलं. त्यामुळे त्याची कसून चौकशी पोलिसांनी केली असता त्याने आपला गुन्हा काबुल केला. यानंतर त्याच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.