संगीता अरबुने, वसई
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती
विमल लिमये यांची ही कविता अनेक घरांच्या भिंतीवर वाचायला मिळते. त्यांनी म्हटल्याप्रमाणे खरेच घर भिंतीनी बनत असलं तरी तिथे राहणाऱ्या माणसांच्या वास्तव्यामुळे ते सजीव होतं, त्याला घरपण प्राप्त होत असतं.. चालत्या बोलत्या माणसारखं त्याला आपलं असं एक व्यक्तिमत्व प्राप्त होतं.. ..अर्थात हे व्यक्तिमत्व आकार घेतं ते त्या घरातल्या माणसांच्या आचार विचारातून, त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीतून, त्यांच्यामधल्या परस्पर संबंधातून. ज्या घरातल्या सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा असेल, प्रेम असेल ती घरं स्नेहार्द असतात. ज्या घरातली माणसं आनंदी, प्रसन्न असतात ते घरदेखील आनंदी असतं..प्रसन्नतेन हसत असत..त्या घरात पाउल टाकताच ती प्रसन्नता आपल्याला देखील जाणवते..त्या घरातून आपले पाय लवकर बाहेर निघत नाहीत..
आज मात्र अनेक घरातली ही प्रसन्नता लोप पावत चाललेली दिसते..यामागे त्या घरातल्या माणसांचं धकाधकीचं, तणावग्रस्त जगणं आहेच. त्याबरोबरच मोबाईलच्या अतिक्रमणामुळे आज अनेक घरातल्या माणसांचा एकमेकांमधला संवाद कमी होत चाललाय,, घरातला प्रत्येकजण आपली स्वत:ची स्पेस जपण्याच्या नादात एकमेकांपासून तुटत चाललाय…कुटुंबातील सदस्यांमधले हे सगळे ताणतणाव, त्यांच्या जगण्याचे पेच, त्यांची दु:खं त्या घरात झिरपत असतात. आपल्याला जाणवत नाही पण या सगळ्यात त्या घराची देखील घुसमट होत असते. ती आतल्या आत अश्रू ढाळत असतात..
त्याबरोबरच दिवसरात्र घरातील टीव्हीवर चालू असणारे सिनेमे, सिरीयल त्यातली कपट कारस्थानं, एकमेकांमधले हेवेदावे, खून मारामाऱ्या या सगळ्यामुळे त्या घरातली शांती देखील भंग पावते …….घरातलं वातावरण, घरातली उर्जा देखील दुषित होत जाते. …काही घरात तर एखादा आवडीचा प्रोग्राम चालू असताना, घरातलं माणूस जरी कामावरून थकून भागून आलं तरी त्याच्या येण्याची फारशी दखल घेतली जात नाही… अगदी बाहेरची व्यक्ती जरी आली तरी समोर मोठ्या आवाजात टीव्ही सुरूच असतो…आणि यजमानाच लक्ष पाहुण्यांपेक्षा टीव्हीत अधिक असतं..अश्या घरात येणाऱ्याला कुठून आपण या घरात आलोय असं होऊन जातं. या सगळ्याचा कळत नकळत परस्परातील नात्यांवर परिणाम होतो..त्याचे पडसाद त्या घरावरही नकळत उमटत असतात…अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे त्यामुळे घरात येणारा अतिथी विन्मुख होऊन परत जाताना पाहून त्या घराचंही काळीज नकळत तुटत असत.
..आजकाल घरातली निगेटिव्ह उर्जा काढून तिथे सकारात्मक उर्जा खेळती राहावी यासाठी वास्तुशात्र, फेंगशुई च्या नावाखाली अनेक उपकरण विकली जातात. भरमसाठ पैसे आकारून अनेक उपाय केले जातात त्याऐवजी या टीव्हीवर काय पहावं काय पाहू नये. कधी आणि किती वेळ पहावं. मोबाईलवरही किती वेळ असावं यावर नियंत्रण ठेवलं. परस्परांतील स्नेह, जिव्हाळा वाढविला..घरी येणाऱ्या जाणाऱ्याची प्रेमाने आस्थेने दखल घेतली तरी ती घरं सकारत्मक उर्जेने भारून जातील.. कारण घराला उर्जा त्यात राहणारी माणसंच देत असतात.
प्रत्येक घर त्या घरातल्या माणसांशी, त्यांच्या सुखदु:खाशी आतून जोडलेलं असतं. घरातली माणसं हसली की ती घरं देखील हसतात आणि ती दु:खाने काळवंडली की ती घरं देखील दु:खाने काळवंडत. घरातली माणसं घरापासून जास्त कालावधीसाठी दूर जातात जातात तेव्हा तीदेखील आपल्यासारखी एकाकी होतात.. आपल्या माणसांची वाट पहात राहतात..म्हणूनच आपण घरी परत येतो तेव्हा ती केविलवाणी वाटतात…….आणि आपला हात फिरताच ती पुन्हा नव्यानं उजळून येतात..हसू लागतात.
मुंबईत कायमच्या वास्तव्याला आलेल्यांची कोकणातली घरं अशीच एकाकीपणाची दु:खं सोसत उभी असलेली दिसतात..गणपतीला गावी जाणार तेव्हा काय तो त्या घरावरून हात फिरणार. तिथली चूल पेटणार. अशी घरं परदेशात स्थायिक झालेल्या मुलांच्या वृद्ध आई वडिलांसारखी भासतात…घरांचं हे एकटेपणाचं, म्हातारपणाचं दु:खं अनिल धाकू कांबळी यांच्या एका कवितेत खूप बोलकं झालंय
ते म्हणतात –
अंथरुणाचा गोळा करते घर म्हातारे
जातंय आता म्हणते म्हणते घर म्हातारे
पापण्यामध्ये फुगे सुजेचे फुटण्या आले
झिजून कण कण उरले कणभर घर म्हातारे
घरं सुद्धा आपल्यासारखी म्हातारी होतात…आणि खुपदा म्हातारी माणसं जे दु:खं भोगतात अगदी तसचं दु:खं म्हातारी घरं भोगत असतात …ती अनेकदा एकटी असतात, दुर्लक्षित असतात. उपेक्षित जीण जगत असतात. डागडुजी अभावी पडझडीला आलेली असतात. स्पर्शासाठी आसुसलेली असतात…हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकायला आतुर झालेली असतात. त्या घरावर माया करून दिगंताच्या प्रवासाला निघून गेलेल्यांच्या आठवणीने उदास झालेली असतात…घराच्या वाटण्या होतात तेव्हा तर ती खूपच दु:खी कष्टी होतात…
नटसम्राट मध्ये अप्पासाहेब बेलवलकर या ‘तुफानाला कुणी घर देता का घर’ म्हणतात तशीच ही एकाकीपणाचं द:खं भोगणारी घर ‘या एकाकी घराला कुणी माणूस देता का माणूस’ अशी आर्त साद घालत नसतील कश्यावरून? फक्त ती साद आपल्याला ऐकू येत नाही.. कारण घर या गोष्टीकडे आपण तितक्या संवेदनशीलतेने पाहत नाही..
खेड्यातल्या एकाकी घरांचं हे दु:ख तर शहरातल्या घरांची वेगळीच दु:खं intiriorच्या नावाखाली त्यांच्यावर घातले जाणारे सततचे घाव झेलून ती पिचलेली असतात..सततच्या अंतर्गत बदलाने ती आपली ओळख देखील हरवून बसतात….काही घरांची सजावट तर इतकी भपकेबाज असते की त्यात ती आपलं घरपण हरवून बसतात. घरात येणाराही आपण घरात आलो की होटेलात आलो या विचाराने बावरतो.
मुंबईसारख्या महानगरातल्या घरांचं तर जमिनीशी नातंच तुटलेलं असतं…घराशी गुजगोष्टी करणारं तुळशी वृंदावन ही हरवलेलं असत. वळचण ही नसतेच…घरातली माणसंही दिवसभर कामधंद्यानिमित्ताने घराबाहेर .ते घर बोलणार तरी कोणाशी? घरातल्यांची वाट पाहत ती एकटेपणाने उसासे टाकत राहतात.
प्रत्येक माणसाला सगळ्यात जास्त ओढ कशाची वाटत असेल तर ती घराची…बाहेर गेल्यानंतर प्रत्येकाला ‘कधी एकदा घरी परतू’ असं होऊन जातं. छोटी मुलं सुद्धा परक्या ठिकाणी गेल्यानंतर अगदी आई सोबत असली तरी ‘घरी कधी जायचं’ म्हणून भुणभुण करतात.. इतकी घराची ओढ बालपणीपासून आपल्या रक्तात भिनलेली असते. कारण तिथे आपण सर्वात जास्त सुरक्षित असतो……
एकटेपणातही आपल्याला सगळ्यात मोठा आधार असतो तो घराचाच. त्याच्या कुशीतच आपण निश्चिंतमनाने ऐसपैस विसावतो. मनसोक्त हसतो, रडतो.. म्हणूनच प्रत्येकाला राहायला घर असण ही नुसती मुलभूत भौतिक गरज नसून ती आपली भावनिक गरज देखील आहे त्याबरोबरच ती जगातली सर्वात मोठी सुखाची आणि भाग्याची गोष्ट देखील आहे.
आपण घराशी कसेही वागलो तरी उन्हापावसात उभं राहून तेच आपल्यावर मायेची सावली धरत असत. आपल्याला आपल्या सगळ्या गुणदोषासहित कुशीत घेत असतं. त्यामुळे घराकडे देखील आपल्याला तितक्याच संवेदनशिलतेने पाहता आलं पाहिजे. घराचं घरपण जपता आलं पाहिजे. घराचं नूतनीकरण करताना घराच्या व्यक्तिमत्वाला धक्का लागणार नाही. ते आपली ओळख हरवणार नाही याचं भान ठेवलं पाहिजे. घराच्या भिंतीवरून सांदी कोपऱ्यातून आपला हात मायेने फिरलाच पाहिजे.. आणि महत्वाचं म्हणजे घराशी देखील आपल्याला संवांद साधता आला पाहिजे..घरं आपल्यासाठी नेहमी तथास्तु म्हणत असतातच त्याबरोबरच ती आपल्याला काही सांगूही इच्छितात..घराचा तो आवाज, घराने आपल्याला घातलेली ती साद आपल्याला ऐकता आली पाहिजे..आणि त्याला प्रतिसादही देता आला पाहिजे.