(देवरुख)
संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथे झालेल्या एकमेव सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीचा तहसील कार्यालय देवरुख येथे निकाल जाहीर झाला. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदाच्या शर्यतीत भाजपाकडून उभ्या राहिलेल्या तालुका उपाध्यक्षा सौ. सुषमा संदीप बने यांनी विजय मिळवला आहे. अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी संगमेश्वर भाजपाने आपली पूर्ण शक्ती पणास लावली होती.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, संगमेश्वर (उत्तर) तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम आदी पदाधिकाऱ्यांनी सातत्याने स्थानिक कार्यकर्त्यांना पाठबळ दिले. त्यामुळे अपेक्षित निकाल जाहीर झाला असे ग्रामस्थांनी सांगितले. सांडीमवाडीच्या श्री. परशुराम सांडीम, श्री. हरिश्चंद्र सांडीम, श्री. अनंत सांडीम, श्री. सखाराम सांडीम, नवनियुक्त ग्रा.पं. सदस्य श्री. रविंद्र सांडीम, सौ. कल्याणी सांडीम आदी ग्रामस्थांनी वर्षांपूर्वी तळेकांटे ग्रामपंचायतीत भाजपाचा सरपंच बसवण्याचा केलेला संकल्प पूर्ण झाला आहे . यामुळे सांडीमवाडीमध्ये मोठा जल्लोष केला गेला.
विजयी उमेदवार सौ. सुषमा बने या भाजपा संगमेश्वर (उत्तर) च्या तालुका कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष असून त्यांचे पती श्री. संदीप बने हे देखील तालुका कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच त्यांचे कुटुंबीय व समर्थक ग्रामस्थ या निकालामुळे अत्यंत आनंदित आहेत. विजयाच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद साजरा केला.
सरपंचपदी विराजमान होणाऱ्या सौ. सुषमा बने यावेळी भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आधारित काम करून पुढील ५ वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार आदर्शपणे चालवण्यासाठी मी आता सिद्ध झाले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व कोकणचे नेते ना. रविंद्र चव्हाण साहेब, मा. आमदार श्री. बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष श्री. राजेशदादा सावंत तसेच आमचे नेते मा. श्री. प्रमोद अधटराव साहेब, श्री. रूपेशदादा कदम, माझे पती श्री. संदीप बने, दिर श्री. संतोष बने तसेच माझ्यावर विश्वास ठेऊन मला मतदान करणारे ग्रामस्थ बंधू-भगिनी या सर्वांना हा विजय समर्पित करते. मी सर्वांना आश्वासित करते, ‘उतणार नाही, मातणार नाही… हाती घेतलेला जनसेवेचा वसा मी टाकणार नाही.’ सर्व हितचिंतकांचे मनस्वी आभार.”