गुहागर : येथील खरे- ढेरे- भोसले महाविद्यालय अखिल भारतीय ग्राहक मंचातर्फे ग्राहक पंधरवड्यानिमित्त ग्राहक जाणीव जागृती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. आज समाजात ग्राहकांची प्रत्येक गोष्टीत पिळवणूक होताना दिसत आहे. होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी प्रत्येक ग्राहकाने कायद्याने दिलेल्या ग्राहक हक्काची माहिती घेऊन त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत सचिव श्री. चंद्रकांत झगडे यांनी केले.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे रत्नागिरी जिल्हा सदस्य निलेश गोयथळे, गुहागर तालुका अध्यक्ष गणेश धनावडे, सल्लागार संतोष देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सावंत, प्रा. रश्मी आडेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा सदस्य निलेश गोयथळे यांनी कार्यशाळा घेण्याचा उद्देश व स्वरूप स्पष्ट केले. तसेच ग्राहक या शब्दाची व्याख्या स्पष्ट केली. असंघटित आणि अज्ञानी ग्राहकांचे संघटित व्यावसायिकांकडून होणारे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी, अनुचित फायदेशीर व्यापारी प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी ग्राहक पंचायतीची स्थापना झाल्याची माहिती त्यांनी दिली. गुहागर तालुका ग्राहक मंचाचे सल्लागार संतोष देसाई यांनी ग्राहक पंचायतीचा इतिहास सांगून ग्राहक पंचायतीने आपल्या परिसरात मार्गी लावलेल्या विषयांची अनेक उदाहरणे देत ग्राहकांनी कसे सावध राहिले पाहिजे याचे मार्गदर्शन केले.
कोकण प्रांताचे सचिव चंद्रकांत झगडे यांनी ग्राहक चळवळीचा इतिहास, ग्राहक पंचायतीची कार्यपद्धती, ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहकांचे हक्क सविस्तर स्पष्ट केले.
सुरक्षितेचा हक्क, माहिती मिळण्याचा हक्क, निवड करण्याचा हक्क, बाजू मांडण्याचा हक्क, अन्यायाविरोधात बाजू मांडण्याचा हक्क, ग्राहक शिक्षण हक्क, पर्यावरण संरक्षण इत्यादी विविध हक्कांबद्दल मार्गदर्शन केले. या हक्काविषयांची उदाहरणे विद्यार्थ्यांपुढे स्पष्ट केले. सन 1986 च्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करून तो सुधारित स्वरूपात सन 2002 मध्ये नव्या स्वरूपात आल्याचे स्पष्ट केले. ग्राहकांच्या हक्काचे निवारण होण्यासाठी ग्राहक न्याय मंच प्रत्येक राज्याच्या मुख्य शहरात, जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तक्रार करावी लागू नये म्हणून कोणती दक्षता घ्यावी तसेच तक्रार करण्याची वेळ आल्यास ती कुठे करावी, याची जाणीव करून दिली.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांनी दैनंदिन जीवनातील लहान गोष्टींविषयी उदाहरण देत लाईट बिल, त्याचे युनिट बद्दल दक्ष राहण्यासाठी सूचित केले. तसेच स्वतःबरोबरच आपल्या परिसरातील नागरिकांना जागरुक ग्राहक बनण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विराज महाजन यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.