(गुहागर)
अति.सचिव व आयुक्त यांच्या आदेशान्वये गुहागर पंचायत समिती मार्फत दि.१० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२२ असे तीन दिवस विशेष प्रशिक्षण गुहागर तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना दिले गेले. दि. १० आॅक्टोबर २०२२ रोजी गुहागर येथे पंचायत समिती सभागृहात गट विकास अधिकारी प्रशांत राऊत व प्रमोद केळुस्कर यांच्या सहकार्याने प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला व तिसऱ्या दिवशी येथेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणांर्थीना जिल्हा परिषद रत्नागिरीचे नरेगा सहाय्यक कार्यकारी अधिकारी साळुंखे व जिल्हा परिषद रत्नागिरीचे नरेगा गट विकास अधिकारी जाधव यांच्या हस्ते प्रमाण पत्र देऊन समारोप करण्यात आला.
या तीन दिवसीय झालेल्या प्रशिक्षणा दरम्याने दुसर्या दिवशी गुहागरच्या सर्व ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षणासाठी गुहागर तालुक्यातील 100% शोष खड्डे पूर्ण झालेले व तशी प्रसिद्धी मिळवलेले गाव खामशेत या गावाची खास निवड करण्यात आली होती.
यावेळी प्रशिक्षणांर्थीना प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद पुणे येथील श्री. गोपाळ शर्मा व श्री. साईराज प्रधान हे लाभले होते. यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरण ग्रामरोजगार सेवकांचे कार्य तसेच मनरेगा मार्फत अनेक रोजगार उपलब्ध करून गावातील सर्व घटक, ग्रामस्थ शेतकरी यांचा आर्थिक स्तर वाढवून, गावातील प्रत्येक कुटुंब कसे समृद्ध करता येईल व विकासाच्या दिशेने “स्वतः समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर तालुका, तालुका समृद्ध तर जिल्हा आणि जिल्हा समृद्ध तर पूर्ण महाराष्ट्र समृद्ध” अशा पद्धतीने विकास साध्य करता येईल असे सांगून त्या करीता अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच गावात गाव फेरी, शिवार फेरी आणि पाहिजे त्याला काम या प्रमाणे कुटूंब सर्वेक्षण याचे प्रात्यक्षिक सुद्धा करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळुस्कर सुद्धा प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी कोळी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, पंचायत समिती नरेगा विभागाच्या तांत्रिक अधिकारी नयना जाधव, गुहागर तहसील विभाग अधिकारी, खामशेत गावचे पोलिस पाटील, ग्रामसेवक तसेच सरपंच श्री. मंगेश सोलकर उपस्थित होते.
यावेळी सरपंच मंगेश सोलकर यांनी खामशेत गावामध्ये कशा प्रकारे मनरेगा अंतर्गत कामे केली व त्यासाठी काय काय नियोजन व अंमलबजावणी करावी लागते याबाबत मार्गदर्शन केले. या संपूर्ण प्रशिक्षणा करिता ग्रामपंचायत खामशेतचे सरपंच व सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती प्रशिक्षणार्थी श्री. प्रशांत कदम (ग्रामरोजगार सेवक, उमराठ) यांनी दिली.