(संगलट-खेड /प्रतिनिधी )
ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांच्या ग्रामीण भागातील मुक्कामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात वस्तीला गेलेल्या एका वाहकाला विषारी सापाने दंश केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
खेड आगारातून तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण २६ ठिकाणी बस रात्रीच्या मुकामासाठी जातात. यामध्ये सवणस, टेटवली, पोफळवणे, पन्हाळजे, आयनी, घोगरे, तिसंगी, शेल्डी, नंदिवली, कुंभाड, कशेडी, बिजघर, अणसपुरे, बिरमनी, रसाळगड, पांगारी, वाडीजैतापूर, वडगांव, तुळशी, शिरगाव, भडवले, सापिर्ली, भेलसई, म्हाप्रळ, उचाट, चोरवणे आदी २६ ठिकाणी मुक्कामासाठी एसटीचे चालक वाहक जात असतात.
रात्री वस्तीच्या ठिकाणी चालक वाहक यांच्या झोपण्यासाठी व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करून ही चालक वाहक यांची व्यवस्था केली जात नसल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते, सध्या तालुक्यातील क्वचित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तिथे साप, विंचू येत असल्याने चालक वाहकांच्या जीवाला धोका असल्याची माहिती काही चालक वेळेत वाहक यांनी बोलून दाखवली.
तीन दिवसांपूर्वी घोगरे येथे मुक्कामासाठी गेलेले वाहक ए. आर. मेहरकर यांना पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान विषारी सापाने दंश केला. ग्रामीण भाग असल्याने रुग्णवाहिका उपलब्ध नाही. ग्रामीण भागात चालक वाहक यांची विश्रांतीची व्यवस्था नाही, सध्या पावसाळा सुरू असल्याने चालक वाहक यांना गाडीतच झोपावे लागत आहे. याची दखल विभाग नियंत्रक यांनी घ्यावी असे त्यांचे म्हणणे आहे.
उपचार मिळण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत वाहकाला बसमधून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने धोका टळला. घटनेचे गांभीर्य ओळखून वाहकाचे प्राण वाचविणाऱ्या चालकाचे सर्वच थरातून अभिनंदन केले जात आहे.