(रत्नागिरी)
ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, व्यावसायिक व भूमीहीन कुटुंबांना लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मग्रारोहयो) “मागेल त्याला पाहिजे ते काम” ही संकल्पना राबविली जात आहे. त्यासाठी दशवार्षिक आराखडा बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील दहा गावांची निवड केली असून ग्रामपंचायतींच्या सहकार्याने आराखडा बनविण्याचे कामही चालू केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गावातील प्रत्येक कुटूंबातील पोहचविणे, प्रत्येक कुटूंबाच्या गरजेप्रमाणे उपलब्ध संसाधनांचा विचार करुन वैयक्तिक लाभाच्या कामांची जोड देत शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत. गावाचा सर्वागिण विकास लक्षात घेता सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, जल व मृद संधारण व पायाभूत सुविधांच्या विकासाशी निगडीत कामांचा समावेश करणे, कुटुंबांना १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करुन त्या माध्यमातून निर्माण होणारे अकुशल व कुशलचे प्रमाण लक्षात घेऊन दहा वर्षात प्रत्येक कुटूंब लखपती करण्यासाठी नियोजन केले आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागपूर आयुक्त कार्यालयाकडून कार्यक्रम व्यवस्थापक अमोल शंभरकर व सीमा तकसंडे, निरीक्षक सतीश शेवडे मार्गदर्शन करत आहेत. दशवार्षिक आराखड्यासाठी जिल्ह्यातील १० गावे निवडली आहेत. त्यामध्ये गांग्राई (चिपळूण), गावतळे (दापोली), रानवी (गुहागर), भिलाई आयनी (खेड), तळवडे (लांजा), पालघर (मंडणगड), जुवाटी (राजापूर), लाजुळ, वळके (रत्नागिरी), सांगवे (संगमेश्वर) यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील निवडलेल्या प्रत्येक गावात जाऊन मग्रारोहयोची टिम स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या, तेथील रोजगार सेवकांच्या मदतीने घरोघरी सर्व्हे करत आहेत. यामध्ये गावातील लोकांच्या गरजा काय आहेत, गावात कोणते प्रकल्प राबवता येऊ शकतात याची माहिती घेतली जात आहे. त्या-त्या कुटूंबाला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उपयुक्त असे कोणते काम देता येऊ शकते यावरही लक्ष टाकले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, व्यावसायिक व भूमीहीन कुटुंबांना लखपती करण्याच्या उद्देशाने फक्त मागेल त्याला काम नाही तर पाहिजे ते काम या उत्कीप्रमाणे दशवार्षिक नियोजन केले जात आहे.