राजापूर तालुक्यातील नाटे गावात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असल्याने नाट्यातील सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत नाटे यांनी काळजी घेण्याकरिता नाटे नगर विद्यामंदिर नाटे, हॉलमध्ये फिव्हर क्लिनिक चालू केले. यात ओपीडी सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात चालू केली आहे.
सकाळच्या सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1 मध्ये डॉ. सुनील राणे उपलब्ध आहेत. तर दुपारी 3 ते 5 सत्रामध्ये डॉ. अवधूत झेंडे उपलब्ध आहेत. तपासणीसह औषधे, भोजन इत्यादी सर्व पूर्णपणे मोफत असेल. सुसज्ज असे 10 बेडचे ऑक्सीजन सिलिंडरची सुविधा असणारे क्लिनिक फक्त दोन दिवसात तयार करण्यात आले.
क्लिनिककरिता 24 तास रुग्णवाहिका सामाजिक कार्यकर्ते संदेश पाथरे यांनी उपलब्ध करून दिली. क्लिनिकमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा संदेश पाथरे यांनी केली आहे. या क्लिनिकला काल स्थानिक आमदार राजन साळवी यांनी भेट दिली आणि सगळयांचे कौतुक केले.
नाटेमधील अनेक ग्रामस्थांनी स्वतःहून या क्लिनिकमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. क्लिनिकसाठी नाटे ग्रामपंचायत सरपंच सौ. योगिता बांदकर, सदस्य, डॉ. सुनील राणे, डॉ. अवधूत झेंडे, नरेश साखरकर, मनोज आडवीरकर, संदेश पाथरे, रमेश लांजेकर, पांडू खांबल, संतोष चव्हाण, सचिन बांदकर, रोहित लाड, भूषण नार्वेकर, प्रवीण होलम यांचे योगदान लाभत आहे.