(निवोशी-गुहागर/उदय दणदणे)
गुहागर तालुक्यात सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या उमराठ ग्रामपंचायतीच्या वतीने गुरूवार १४ एप्रिल २०२२ रोजी उमराठ ग्रामपंचायत कार्यालयात गोरगरिबांचे दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या आनंदाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत उमराठचे सरपंच श्री जनार्दन आंबेकर यांनी जयंती संदर्भात प्रस्तावना करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व मेणबत्ती प्रज्वलित करून डॉ बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी उमराठ गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री संदीप गोरिवले तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थांनी सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
सदर जयंती सोहळ्यासाठी सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे, सदस्या प्रज्ञा पवार कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम सोबत तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, गोरिवलेवाडीचे वाडीतील प्रमुख शांताराम गोरिवले, जालगावकर वाडीचे वाडी प्रमुख अशोक जालगावकर, विनायक जालगावकर, बौद्धवाडीचे वाडी प्रमुख विनायक कदम, कुंदन कदम, वसंत कदम, योगेश कदम, अविनाश कदम, रूपेश कदम तसेच बहुसंख्य तरूण मंडळी, लहान मुले आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने सामुहिक प्रार्थनेचे आयोजन सुद्धा करण्यात आले. प्रार्थनेमध्ये प्रामुख्याने प्रशांत कदम तसेच जयश्री कदम, ऋृती कदम, योगिता कदम, उषा बामणे, शर्वरी कदम, विजया पवार, रूचिता कदम इत्यादी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
सदर जयंती सोहळा प्रसंगी सरपंच जनार्दन आंबेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, शांताराम गोरिवले, वसंत कदम आणि विनायक कदम यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बालपणाचा परिचय देऊन मार्गदर्शन केले. सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या महान कार्याबद्दल गौरव करून तरूणानो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या “शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा” या संदेशाची आठवण करून दिली.
ग्रामपंचायत कार्यालयातील जयंती सोहळा आटोपल्यानंतर बौद्धवाडीचे प्रवेशद्वार असलेल्या मुख्य रस्त्यावर ध्वजस्तंभावर बौद्ध धर्माचे प्रतिक असलेल्या ध्वजाचे बौद्धवाडीचे वाडी प्रमुख विनायक कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्या नंतर बौद्धवाडीच्या बौद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले व सामुहिक प्रार्थना आणि बाबासाहेबांच्या कार्य-गौरवपर मान्यवरांची भाषणे झाली. यामध्ये सरपंच जनार्दन आंबेकर तसेच बौद्धवाडीतील लहान मुलांचा मोठा सहभाग होता. शेवटी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सदर जयंती सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व लहान-थोर ग्रामस्थांना जयंती निमित्त शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले.