(गुहागर)
शुक्रवार दि. १४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत उमराठच्या कार्यालयात गोरगरिबांचे, दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सरपंच जनार्दन आंबेकर आणि शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या उत्साहात अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर तसेच शाळा नं. १ चे शिक्षक अनिल अवेरे यांनी बाबासाहेबांचा परिचय, त्यांचे योगदान व समर्पक कार्याबद्दल गौरवोद्गार करून अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या कार्याबद्दल, गुणगौरवांबद्दल उत्स्फुर्तपणे भाषणे केली.
त्यानंतर ग्रंथालयाचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत उमराठ कार्यालयात उद्घाटन केले. सध्या टि.व्ही. आणि मोबाईलमध्ये विद्यार्थी आणि ग्रामस्थ, पालकवर्ग वाजवी पेक्षा अधिक आकर्षित झालेले दिसतात. वाचनाची आवड बऱ्याच अंशी पुर्वी पेक्षा कमी झालेली दिसते. यावर प्रकाश टाकून विद्यार्थींनी भरपुर वाचन केले पाहिजे, पुस्तकी ज्ञानाबरोबर अवांतर ज्ञान वाढले पाहिजे. त्यातून प्रगल्भता वाढीस जावून आताचा विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक तयार झाला पाहिजे. अशा बहुउद्देशाने ग्रंथालयाची/ वाचनालयाची संपल्पना असल्याचे सांगून या ग्रंथालयाचा लाभ गावातील सर्व ग्रामस्थांना सुद्धा दिला जाणार आहे, असे यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले. ग्रंथालयाचा फायदा सर्वांना मिळणार असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी तसेच उपस्थित ग्रामस्थांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आनंदाने कौतुक करत समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमानंतर उमराठ कदमवाडीतील बुद्ध विहारात सुद्धा बाबासाहेबांच्या जयंती निमित्त बौद्धजन ग्रामस्थ मंडळ उमराठ यांच्यावतीने छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पून पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर तसेच उमराठ शाळा नं.१ चे मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर यांनी समोयाचीत मार्गदर्शन केले. येथेही विद्यार्थींची भाषणे झाली. यावेळी बौद्धजन ग्रामस्थ मंडळ उमराठ यांच्यावतीने विद्यार्थांना वह्या व पेन वाटप करण्यात आले.
सदर संपूर्ण कार्यक्रमात ग्रामपंचायत उमराठचे ग्रामसेवक, सिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सुरज घाडे, शाळा नं. १ चे मुख्याध्यापक प्रदिप रामाणे, अनिल अवेरे, सौ. सायली पालशेतकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, ग्रामस्थ नामदेव पवार, महेश गोरिवले, शितिज गोरिवले, शाळा कमिठी अध्यक्ष श्रीकांत कदम, अंगणवाडी सेविका सौ. वर्षा पवार, मदतनीस सौ. समृद्धी गोरिवले, विनायक कदम, कुंदन कदम तसेच शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थीनी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम नियोजन ग्रामपंचायत उमराठचे लिपीक नितीन गावणंग, रोजगार सेवक प्रशांत कदम व डाटा आॅपरेटर साईस दवंडे यांनी केले होते.