(गुहागर)
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील कामकाजात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन नवभारत वृत्त समूहाचे मराठी राष्ट्रीय दैनिक नवराष्ट्रच्यावतीने सरपंच जनार्दन आंबेकर यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार जाहीर झालेला होता. त्यांचा सन्मान रविवार दि.२४.१२.२०२३ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील “सावंत पॅलेस हाॅटेल” येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत “आदर्श सरपंच” सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
समाजात अनेक अशा महनीय व्यक्ती असतात की ज्या आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या तेजाने तळपत असतात. आपल्या कार्याचा ठसा उमटवत असतात. मात्र प्रत्येक वेळी अशा महनीय व्यक्तींच्या कार्याची दखल घेतलीच जाते असे नाही. शाबासकीची थाप पाठीवर मिळतेच असे नाही. याची दखल घेऊन दैनिक नवभारत ग्रुपचे मराठी दैनिक नवराष्ट्रने गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा शोध घेत त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यासाठी नवराष्ट्र सन्मान सोहळ्याचे आयोजन सुरू केले आहे. यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा, समुहाचा त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार पुरस्कार देण्यात आला.त्यातीलच एक भाग म्हणून उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांना सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामसभेत ठराव मंजूर करून विधवा अनिष्ट प्रथा, पुर्वापार चालत आलेल्या कालबाह्य रूढी-परंपरा, बालविवाह आणि अंधश्रद्धा यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी धाडसी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी ग्रामपंचायत उमराठच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाड्यांत सुरू केलेली आहे. तसेच विधवा महिलांना धार्मिक कार्यात हळदीकुंकू देऊन सन्मान करण्याची प्रथा चालू केलेली आहे. अशा प्रकारे विधवांना समाजात मानसन्मान मिळवून देण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल तसेच आईवडिलांना सांभाळत नाही तर मालमत्तेत वारस नोंद लावता येणार नाही, वडिलोपार्जित जमीनजागा शक्यतो विकू नका, परप्रांतीयांना तर नकोच नको असे आणखी धाडसी निर्णय ग्रामसभेत ठराव करून संमत करण्यात आले आहेत. शिवाय शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या अनेक सोयी – सुविधांचा, विकास कामांचा सुद्धा ग्रामस्थांना /लाभार्थींना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत उमराठ सदैव अग्रेसर असते. अशा अनेक बाबींमुळे जनार्दन आंबेकर यांची आदर्श सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती.
सदर “आदर्श सरपंच” सन्मान केल्याबद्दल नवभारत वृत्त समूहाचे मराठी राष्ट्रीय दैनिक नवराष्ट्र परीवाराचे ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच हा सन्मान मिळण्यासाठी सक्रिय सहभाग घेऊन मोलाचे योगदान दिल्याबद्दल उमराठ खुर्द आंबेकरवाडी व उमराठ बुद्रुक या दोन्ही महसुली गावांतील सर्व वाड्यांतील ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायत उमराठचे ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे भाऊ, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप गोरिवले, कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, शाईस दवंडे, उपसरपंच सुरज घाडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सुद्धा आभार मानले आहेत.