(राजापूर)
विनापरवाना गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी रायपाटण पोलिस क्षेत्रच्या पोलिसांनी एका ४५ वर्षीय महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ताम्हाने गावातील चौगुले स्वयंसहायता समूह बचतगटाच्या अध्यक्षा सौ. सानिका संदीप चव्हाण आणि त्यांच्या सदस्या यांच्या तक्रारीवरून रायपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हेडकॉन्स्टेबल के. आर. तळेकर, पोलिस कॉन्स्टेबल बी. आर. कोळी यांनी ही कारवाई केली आहे.
रायपाटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताम्हाने गावातील ताम्हनकर वाडीत या महिला गोवा बनावटीची दारू विक्री करीत असल्याची माहिती ताम्हाने पहिलीवाडीतील चौगुलेबाबा स्वयंसहायता समूह बचतगटाच्या महिलांना मिळताच त्यांनी त्या महिलेच्या घरी धडक देऊन गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या होत्या. त्यावेळी या बचत गटाच्या अध्यक्षा सानिका संदीप चव्हाण यांच्या समवेत सौ. सानिया संतोष कुडाळकर, सौ. वेदिका विक्रांत चव्हाण, अस्मिता अजय सौंदळकर, सायली संतोष चव्हाण, मनोरंजना मधुकर चव्हाण आदी महिलांनी धडक देऊन हस्तगत केलेल्या बाटल्यातील दारू रस्त्यावर ओतून आपला राग व्यक्त केला होता. त्यानंतर चौगुलेबाबा स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सानिका चव्हाण, यानी रायपाटण, पोलिस दूरक्षेत्रचे पोलिस हेडकॉन्स्टेबल के. आर. तळेकर यांच्याशी संपर्क साधून तक्रार देताच पोलिस तत्काळ ताम्हने गावात हजर झाले. सर्व माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी गोवा बनावटीच्या अकरा बाटल्या पंचनामा करून ताब्यात घेतल्या.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गोवा बनावटीची दारू बाळगल्याबद्दल संबंधित महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. राजापूर पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.