(खेड / भरत निकम)
शहरातून भरणे येथील मुलाच्या दुकानात निघालेल्या ६८ वर्षीय वृध्दाला लुटण्याचा प्रकार गोळीबार मैदान समोरील गतिरोधक येथे घडला आहे. राजन सहदेव दळवी (वय ६८, रा.महात्मा फुलेनगर,शिवतररोड, खेड) असे त्यांचे नाव आहे.
खेड शहरातील राजा मंडप डेकोरेटरचे मालक राजन सहदेव दळवी यांच्या मुलाचे भरणे येथे दुकान आहे. दिवसातून एकदा ते भरणे येथे जाऊन येत. नेहमी प्रमाणे ते ॲक्टीवा दुचाकी घेऊन निघाले होते. ते महाडनाका गोळीबार मैदान येथील गतिरोधका जवळ त्यांना अनोळखी इसमाने हात दाखवून थांबवले. त्या व्यक्तीने पोलिस असल्याची बतावणी केली आणि ‘आम्हाला गाड्या तपासणी करायला सांगितले आहे’, असे सांगून मोबाईल, डायरी, सोन्याचे ब्रेसलेट आणि गळ्यातील गोप काढून रुमालात गुंडाळून रुमाल त्यांच्या खिशात ठेवला. त्यानंतर पाठीमागून आलेल्या दुचाकीवरुन भरणे बाजूला निघून गेले होते.
घटनास्थळावरुन पुढे आण्णाचा पऱ्या या ठिकाणी थांबून खिशातील रुमाल काढून बघितले. तेव्हा रुमालात मोबाईल आणि डायरी होती. मात्र सोन्याचे ब्रेसलट व सोन्याचा गोप असा दोन लाख ३० हजार रुपये किंमतीचे दागिने नव्हते. यानंतर खात्री झाल्यानंतर दोन अनोळखी इसमांनी चोरल्याने येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ३४५/२०२३ नुसार भादवि कलम ४२०, १७० व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.