(ठाणे)
भाजपचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात घडली. या गोळीबारात कल्याण शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना ५ गोळ्या लागल्या, तर राहुल पाटील यांना एक गोळी लागली. या दोन्ही जखमीना उल्हासनगरच्या मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सकाळी पहाटे महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया करून ५ गोळ्या त्यांच्या शरीरातून काढण्यात आल्या. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणी आणि संदीप सर्वणकर या तिघांना अटक करण्यात आली.
या गोळीबार प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड, त्यांचा पुत्र वैभव गायकवाड याच्यासह सहा जणांवर भादवी कलम 307, 120 ब, 34, 143, 147, 148, 149 सह शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी उल्हासनगर न्यायालयाने त्यांना 11 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन पिस्तुल जप्त केली असून फरार आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयासमोर केली होती.
त्यानंतर पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे, संदीप सरवणकर आदी तिघांना अटक केली. त्यांना आज (शनिवारी) दुपारी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी दोन्ही गटात वादंग होण्याची शक्यता असल्याने सकाळी आमदार गायकवाड यांना सुरक्षेच्या कारणास्तव उल्हासनगर येथून ठाण्याच्या कळवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना न्यायालयात थेट हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयात सुनावणी घ्यावी अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली.
मात्र, न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणीस नकार देत आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. त्यानंतर आमदार गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आमदार गायकवाड यांची 14 दिवसांची पोलीस कस्टडी मिळावी, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणपत गायकवाड यांनी भर कोर्टात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घटना घडली तेव्हा तिथे माझा मुलगा नव्हता. पण पोलिसांनी माझ्या मुलाला आरोपी बनवून त्याला अटक केली आहे, असं सांगतानाच माझ्या सारख्या माणसाला कायदा का हातात घ्यावा लागला? असा सवालच गणपत गायकवाड यांनी केला. शिंदे बापलेकांनी माझ्यावर अन्याय केला. मी देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सांगितलं. पण त्यांनीही दुर्लक्ष केलं, असंही गायकवाड यांनी कोर्टात म्हटलं आहे.
गुन्हा घडल्यानंतर आरोपी गणपत गायकवाड यांनी जे प्रसारमाध्यांशी संभाषण केलंय ते पडताळण्यासाठी व्हॉइस सँपल घ्यायचे आहेत. हा एक सुनियोजित कट आहे, त्यामुळे कमी पोलीस कोठडीत याचा तपास होणे शक्य नाही, असं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं.