(चेन्नई)
आयपीएल २०२३ चा ५५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवार, दि. ९ मे रोजी चेपॉक मैदानावर खेळला गेला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी सहज जिंकला. चेन्नईचा या मोसमातील हा ७ वा विजय होता. यामुळे ते आता १५ गुणांसह गुणतालिकेत दुस-या स्थानावर आहेत. या पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफच्या शर्यतीतील प्रवास जवळपास संपला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा २७ धावांनी पराभव केला आहे. एमएस चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्लीला १६८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ २० षटकात ८ विकेट्सवर केवळ १४० धावाच करू शकला.
चेपॉकमध्ये चेन्नईला पराभूत करण्यात दिल्लीला गेल्या १३ वर्षांपासून अपयश आले आहे. या सामन्यात सीएसकेने दिल्लीचा एकतर्फी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकांत ८ विकेट गमावत १६७ धावा केल्या होत्या. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक २५ धावा केल्या, याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायडू यांनीही अवघड विकेटवर चांगली फलंदाजी केली.
रायुडू बाद झाल्यानंतर, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत सीएसकेला १६७ धावांपर्यंत पोहोचवले. धोनीने नऊ चेंडूत २० धावा केल्या, ज्यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. जडेजाने एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावांचे योगदान दिले. मिचेल मार्शने धोनी आणि जडेजा या दोघांच्या विकेट घेतल्या.
शेवटी एमएस धोनीची ९ चेंडूत २० धावांची झंझावाती खेळी खूप महत्त्वाची होती तर रवींद्र जडेजानेही २१ धावांची चांगली खेळी केली. याशिवाय दिल्लीकडून मिचेल मार्शने ३ विकेट घेतल्या. यामुळे तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अक्षर पटेलनेही २ विकेट्स घेतल्या. खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादव यांनाही १-१ असे यश मिळाले.