(मुंबई)
कल्याणच्या खडकपाडा येथे राहणारे शेजपाल हे भांडूप येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. गुरुवारी सायंकाळी ते कलेक्शनचे काम आटपून मुलुंड पश्चिमेतील जठा शंकर मार्ग येथील इमारतीत असणाऱ्या संगम व्हिडीओ पार्लरमध्ये व्हिडीओ गेम खेळण्यासाठी गेले होते. याचवेळी मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेच्या पथकाने या व्हिडीओ पार्लरवर छापा घातला, छापेमारी सुरू असताना दिलीप शेजपाल या ग्राहकाला अचानक फिट आली, त्यांना उपचारासाठी अग्रवाल रुग्णालय येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शेजपाल यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत तपास सुरु असून त्यांचा मृतदेह मुलुंड पोलिसांनी शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कळू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.