(वैभव पवार / गणपतीपुळे)
मागील काही दिवसांपासून रत्नागिरी तालुक्यातील गॅस वितरक यांच्याकडून गॅस कनेक्शन आधारकार्ड अपडेट या नावाखाली गॅस वितरक यांच्याकडून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरले जात असून याप्रकरणी ग्राहकांची अक्षरशः ससेहोलपट होत आहे. कारण गॅस वितरक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य ग्राहकांना प्रचंड मनस्ताप दिला जात असून याप्रकरणी योग्य निर्णय गॅस वितरक यांच्याकडून न झाल्यास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचा इशारा वाटद ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अप्पा धनावडे यांनी दिला आहे.
शांतादुर्गा गॅस वितरक कंपनीकडून सध्या गॅस कनेक्शन कार्ड आणि आधार कार्ड यांचे ई – केवायसी करणे सुरू आहे. मात्र रत्नागिरी तालुक्यात सर्वच ठिकाणी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण न केल्यास गॅस बंद केला जाणार असल्याच्या बातमीने एकाच दिवशी गॅस वितरण केंद्रावर झुंबड उडाली असल्याने ग्रामीण भागातून गेलेल्या ग्राहकांना आर्थिक आणि मानसिक प्रचंड त्रास झाला असून याबाबत शांतादुर्गा गॅस वितरक आणि त्यांचे कर्मचारी मात्र अत्यंत निर्ढावलेल्या स्वरूपात गेलेल्या ग्राहकांशी वागत असल्याने प्रचंड मनस्ताप झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कारण एकावेळी सदर ईकेवायसी होत नाही. त्यामुळे यासाठी किमान दोन फेऱ्या माराव्या लागतात. सर्वसामान्य ग्राहकांना रत्नागिरी तालुक्याच्या ग्रामीण भागातून येण्यासाठी बस – वा इतर वाहनाने येताना किमान एका खेपेला २०० च्या वर खर्च येतो. अशावेळी जर दोन किंवा तीन खेपा घालाव्या लागत असतील तर सर्वच ग्राहकांना ते प्रचंड चीड आणणारे ठरणारे आहे.
या पार्श्वभूमीवर अप्पा धनावडे यांनी मत व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले की, इ केवायसी होणे गरजेचे आहे. मात्र सदर ईकेवायसी प्रक्रिया राबवताना रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागात या कॅम्पचे आयोजन करण्यात यावे. तसेच यासाठी ग्रामपंचायत वा अन्य शासकीय संस्था यांची मदत घेऊन सदर कॅम्प आयोजित केल्यास मोठा प्रतिसाद सुद्धा लाभेल आणि लोकांना आर्थिक व मानसिक त्रास होणार नाही. मुळात या गॅस वितरक हे ग्रामीण भागातील नेटवर्क नसल्याचा कांगावा करत असतात. नेटवर्क नलेल्या ग्रामीण भागात राहणे हा ग्रामीण भागातील लोकांचा गुन्हा आहे का असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी केला आहे. त्यासोबतच ज्या ठिकाणी या गॅस वितरकांची कार्यालये आहेत त्याठिकाणी देखील नेटवर्क नसते, मग सर्वसामान्य ग्राहक यांना बोलावून ताटकळत ठेवणे हे ग्रामीण भागातील लोकांच्या भावनांचा अनादर करणारे असून ते खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून त्यांनी रत्नागिरी तालुक्याचे तहसीलदार यांच्याशी संवाद साधत ग्रामीण भागात वरील केवायसी पूर्ण करण्यासाठी आवश्यक कॅम्पचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त करताना, जर असाच प्रकार गॅस वितरक यांच्याकडून सुरू राहणार असल्यास लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारादेखील दिला आहे.