(गुहागर)
सर्पदंश रुग्णावर उपचार करण्यासाठी आपल्या डाँक्टर पत्नीला सांगून खासगी क्लिनिकमध्ये सेवा बजावणाऱ्या गुहागर ग्रामीण रुग्णालयातील डाँक्टरविरोधात गुहागर येथील ग्रामस्थ राहुल उल्हास कनगुटकर यांनी कोल्हापूर उप संचालक आरोग्य सेवा यांसह आरोग्य मंत्री, पालकमंत्री, आमदार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, राहुल कनगुटकर हे पालशेत येथील आपली बहीण पिलणकर यांना सर्पदंश झाल्याने गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्यावेळी तेथे शाळा तपासणी डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. शशांक ढेरे यांच्या पत्नी डाँ. गीता करे यांनी निदान करुन त्यांच्यावर उपचार सुरु केले. दरम्यान, दिलेल्या इंजेक्शनमुळे सौ. पिळणकर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना विचारले की, आज डॉ. शशांक ढेरे यांची ड्युटी असताना ते आहेत कुठे, यावर त्यांच्या पत्नी डाँ. गीता करे यांनी डाँक्टर आजारी असल्याचे सांगून मी ड्युटी करत असल्याचे सांगितले. संबंधित नातेवाईकांनी याची खात्री करण्यासाठी आपली माणसे शृंगारतळी येथील डॉक्टरांच्या खासगी क्लिनिकमध्ये पाठवली. त्यावेळी डाँ. शशांक ढेरे हे शृंगारतळी येथील खासगी क्लिनिकमध्ये सेवा बजावत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. गीता करे यांनी डाँक्टर आजारी असल्याचे खोटे बोलून रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल केली. ही सर्व बाब गुहागर ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकारिणीतील सदस्य सिध्दिविनायक जाधव यांच्यासमोर डॉ. गीता करे यांनी याची कबुली दिली.
रुग्णांना आर्थिक भुर्दड
गुहागर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पूर्ण औषधोपचार मिळत नाहीत. उत्तम प्रकारची यंत्रसामुग्री उपलब्ध असतानाही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने उपचाराविना रुग्णांना परत जावे लागते. परिणामी, रुग्ण खासगी रुग्णालयाकडे जातात. त्यांना आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच एखाद्या गरोदर स्त्रीला प्रसुतीसाठी आणली असता नेहमी त्यांना उपजिल्हा रुग्णालय कामथे व जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे पाठवविले जाते.