(निवोशी-गुहागर / उदय दणदणे)
गुहागर तालुका पर्यटनासह बांधकाम तसेच उद्योग क्षेत्रात प्रगतीची उंची गाठत आहे. वाढते शहरीकरण व गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगातळी सारख्या मध्यवर्ती शहरात नुकतीच गादी कारखान्याला भीषण आग लागून फार मोठं नुकसान झालं होतं. सदर प्रसंगी अग्निशामन दलाची गाडी जवळ जवळ तीन तास उशिराने पोहचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
मात्र सदर घटनेची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत यांची मुबंई येथे दिनांक-१० नोव्हेंबर २०२२ रोजी मुक्तागिरी या त्यांच्या शासकीय बंगल्यावर भेट घेऊन निवेदनाद्वारे गुहागर तालुक्यामध्ये भविष्यात होणाऱ्या आपत्ती पासून वेळेवर बचाव कार्य होण्यासाठी गुहागर नगरपंचायत अथवा योग्य अशा शासकीय ठिकाणी गुहागर तालुक्यात अग्निशमन दलाची व्यवस्था होऊन अग्निशमन दलाचे वाहन सुसज्ज असावे अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
आपत्ती काळात कंपनीवर विसंबून राहावे लागते मात्र कंपनीपासून घटनास्थळी येण्यासाठी विलंब होत असल्याने अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याचा गांभीर्याने विचार करून आपण ही सुविधा गुहागर वासीयांना मिळवून द्याल अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. सदर आमच्या मागणीला उद्योग मंत्री तसेच पालकमंत्री उदय सामंत हे सकारात्मक असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष -प्रमोद गांधी यांनी सांगितले. सदर वेळी मनसेचे गुहागर तालुका सह संपर्क अध्यक्ष Adv. संदिप आग्रे व समीर जोयशी उपस्थित होते.