(गुहागर / उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ येथे विद्यमान सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर हे फेब्रुवारी २०२१ पासून कार्यरत आहेत. विकास कामांबरोबरच शासनाच्या विविध सोयी-सुविधा/ योजनांची माहिती देणे तसेच वैद्यकीय आरोग्य शिबीरे, आधुनिक शेती संबंधित कृषी अधिकाऱ्यांची शिबीरे व चर्चासत्रे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची शिबीरे, तहसिलदार आणि तलाठी कार्यालयाशी संबंधित शिबीरे, पोस्ट खात्याशी संबंधित विविध योजनांची माहिती शिबीरे व चर्चासत्र आयोजित करून ग्रामस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ ग्रामस्थांनी कसा घ्यावा, विधवा व निराधार महिलांना पेन्शन मिळवून देणे, गावातील शाळेत होणाऱ्या विविध कार्यक्रमांत प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे यावर तसेच इतर लोकोपयोगी कामे करण्यावर त्यांचा सतत भर असतो.
उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उमराठच्या ग्रामसभेमध्ये विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक सकारात्मक निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी स्वतःच्या कुटूंबापासून काकांच्या अंत्यविधीच्या सोपस्कार प्रसंगापासून ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.
नुकतंच साजरा झालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात हर घर तिरंगा अभियानात ग्रामपंचायत कार्यालयात विधवा महिलेचा सन्मान करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महिलांना प्राधान्य व महिलांचे सक्षमीकरण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. या सर्व बाबींचा विचार करता सरपंच जनार्दन आंबेकर यांना National Rural Development Foundation (Reg.) Belagavi Health & Nature Development Society, Belgavi ही कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तिन्हीं राज्यांत कार्यरत असणाऱ्या या संस्थेकडून आंतरराज्य आदर्श सरपंच म्हणून गौरव पुरस्कार जाहीर झाला होता.
सदर पुरस्काराचे शनिवार दि. ०८ ऑक्टोबर २०२२ रोजी धर्मनाथ भवन, अशोक नगर, गँगवाडी, बेळगाव या ठिकाणी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षण अधिकारी, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आला. या निमित्ताने कोकणातील स्थानिय स्वराज्य संस्था ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्या बद्दल उमराठ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जनार्दन आंबेकर यांचा सुद्धा आंतरराज्य आदर्श सरपंच म्हणून गौरव पुरस्कार देऊन मोठ्या दिमाखात सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, अभिनंदन पत्र, सन्मान पत्र, म्हैसूर फेटा व चंदनाचा हार असे सदर पुरस्काराचे स्वरूप होते.
उमराठ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जनार्दन आंबेकर यांना अल्पावधीतच आंतरराज्य आदर्श सरपंच म्हणून गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. गावातील ग्रामस्थांचा सदैव सक्रिय सहभाग व सहकार्यामुळेच लोकोपयोगी निर्णय घेता येतात त्यामुळे या पुरस्काराचे संपुर्ण श्रेय ग्रामस्थांना जातेअसे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले. सदर गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्याबरोबर उमराठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरज घाडे, कर्मचारी असिस्टंट नितीन गावणंग व रोजगार सेवक प्रशांत कदम उपस्थित होते.