(गुहागर)
शहरातील वरचापाट येथील तीव्र वळणावर चारचाकी वाहन एस.टी.वर येवून आदळले. या अपघातात चारचाकीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सदर अपघातानंतर चारचाकीच्या मालकाने एस.टी.ला नुकसाभरपाई देवून प्रकरणाला पूर्णविराम दिला. त्यामुळे पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झालेली नाही.
बुधवारी (ता. 21) दुपारी अनिल कृष्णा कदम आपल्या मालकीची चारचाकी (एम.एच.06 टी 6033) घेवून गुहागरकडून रानवीकडे जात होते. तर पिंपळवट गुहागर ही एस.टी. (क्र. एमएच 14 बी.टी.1586 ) आरेगावातून गुहागरच्या दिशेने येत होती. दोन्ही वहाने वरचापाट येथील तीव्र वळणात असताना चुकीच्या बाजुने आलेल्या अनिल कदम यांच्या वाहनाने एस.टी.ला धडक दिली.
चुकीच्या दिशेने येणारी चारचाकी आपल्या एस.टी.वर आदळणार हे जाणून एस.टी. चालक देवरूखकर यांनी एस.टी. बाजुला घेवून थांबवली. त्यामुळे धडकेची भीषणता खूप कमी झाली. यावेळी एस.टी.मध्ये प्रवासी व विद्यार्थीही होते. सदर अपघातात दोन्ही वाहनांमधील कोणीही जखमी झाले नाही. मात्र धडकेत एस.टी.चे किरकोळ नुकसान झालेले असल्याने या तडजोडीला एस.टी.चे अधिकारी तयार झाले. त्यामुळे सदर अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही.