(गुहागर / प्रतिनिधी)
तालुक्यातील साखरी आगर येथील कातळवाडी येथे तळ्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ६.०० वाजता ही दुर्घटना घडली. प्रज्ज्योत उदय मेहता असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुहागर तालुक्यातील कोंडकारुळ जागकरवाडी येथे राहणारा प्रवज्योत हा २४ वर्षीय तरुण आपल्या चौघा मित्रांसोबत साखर आगार तळ्यावर सायंकाळी ४ वा. च्या दरम्यान पोहायला गेला होता. सुमारे दीड ते दोन तास सर्वांनी पोहण्याचा आनंद लुटला. त्यानंतर ते तळ्यातून बाहेर आले. थोड्या वेळाने त्यांना पुन्हा तळ्यात उतरण्याचा मोह झाला. या मोहानेच घात केला.
एका बाजूला तिघे मित्र उभे असताना प्रज्योत याने दुसऱ्या बाजूने सुर मारला. बराच वेळ तो पाण्यातून वर येत नसल्याने इतर तिघांनी उड्या मारून त्याचा शोध घेतला. त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढूनही तो हालचाल करत नव्हता. अखेर एका खाजगी वाहनाने मित्रांनी त्याला हेदेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टर चंद्रकांत कदम यांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी भा.द.वि. कलम १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्री. तडवी, किशोर साळवी याप्रकरणी अधिक तपास करीत आहे