( जैतापूर / वार्ताहर )
जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या राजाला शुक्रवारी सायंकाळी उत्साहात मिरवणुकीने निरोप देण्यात आला.
जैतापूर एसटी स्टँड येथे जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक आणि शिवराज्याभिषेकाचा देखावा सादर करत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेतही या मंडळाने सहभाग घेतलेला आहे. या मंडळाने गेल्या वर्षभरात जवळपास 25 सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक ज्यामध्ये विशेषता महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक साक्षरता, उद्योग व्यवसाय मार्गदर्शन, आरोग्य शिबिर, महिला आनंदोत्सव , रक्तदान शिबिर, गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता, पाणी आडवा पाणी जिरवा, सायबर जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक जनजागृती पर विषय घेऊन पथनाट्य स्पर्धा आदी उपक्रम राबविले होते.
उत्सवाच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षीची उत्सव मूर्ती विक्रांत नारकर यांनी दिली होती तर यशराज आर्ट्स दळेचे प्रणव संतोष गिरकर यांनी अतिशय सुबक व आकर्षक मूर्ती साकारली होती. या उत्सवाला राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शितल जाधव, सागरी पोलीस ठाणे नाट्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह, माजी विधान परिषद सदस्य हुस्नबानो खलीफे, भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, शिवसेना तालुकाप्रमुख कमलाकर कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबा आडीवरेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष उर्फ बंड्या बाकाळकर यांसह सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी देत राजाचे दर्शन घेतले.
शुक्रवारी सायंकाळी चार वाजता जैतापूर एसटी स्टँड येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. तत्पूर्वी ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी काढलेल्या जुलूस रॅलीचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
जैतापूर एसटी स्टँड ते जैतापूर बंदर धक्का अशी ही विसर्जन मिरवणूक गौरी म्युझिकल बॅन्जो पार्टी तुळसुंदे यांच्या वाद्याच्या गजरात जल्लोषात संपन्न झाली रात्री आठ वाजता जैतापूर खाडीमध्ये राजाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ईद-ए-मिलाद रॅली आणि गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक एकत्रित असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी यांच्या उपस्थितीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
उत्सवासाठी जमातुल मुस्लिम कमिटी जैतापूर यांनी जागा उपलब्ध करून दिली होती तर जैतापूर ग्रामपंचायत तसेच श्री देव वेताळ मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले होते. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सल्लागार गिरीश करगुटकर, राजन लाड, राजेंद्र प्रसाद राऊत, अध्यक्ष राकेश दांडेकर, उपाध्यक्ष महेश नारकर सचिव सुनील करगुटकर, खजिनदार वासुदेव नारकर, श्रीकृष्ण राऊत, सौ. रेशम लाड, गजानन करमळकर , प्रसाद मांजरेकर, स्वप्निल सोगम, श्री व सौ प्रियांका प्रकाश नार्वेकर, दिवाकर आडवीरकर, मंगल मयेकर, सुहास पवार, सिमरन मांजरेकर, स्मिता करगुटकर, शैलजा मांजरेकर ,सिद्धी शिरसेकर, बंदिनी मांजरेकर, रिया मांजरेकर, प्रथमेश करगुटकर दशरथ चाळके संदीप चव्हाण, भरतृहरी भाटकर, मनीष करगुटकर, दीपक नंदुरबारे, निलेश पालकर, हर्षद मांजरेकर, नयन मांजरेकर यांसह राजाच्या सर्व सेवकांनी होण्यासाठी परिश्रम घेतले.
उत्सवाला आर्थिक आणि वस्तूरूप देणगी देऊन सहकार्य करणाऱ्या तसेच उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.