(रत्नागिरी)
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे (ता. शाहुवाडी) येथील गाभा क्षेत्रात विनापरवाना शस्त्रास्त्रासह घुसलेल्या संदिप तुकाराम पवार, (रा. हातिव-गोठणे पुनर्वसन), मंगेश जनार्दन कामतेकर आणि अक्षय सुनील कामतेकर, (रा. गुरववाडी, मारळ ता. संगमेश्वर) या तीन आरोपींना रत्नागिरी न्यायालयाने ७ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. शिकारीच्या उद्देशाने शस्त्रासहित व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाना घुसणे आरोपींना चांगलेच महागात पडले आहे.
याबाबत माहिती अशी, अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात आरोपी ३१ मार्च रोजी दिसून आले. त्याचा वनगुन्हा वनरक्षक रामदास दणाने यांनी दाखल केला. वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी या घटनेबाबत कराडच्या विभागीय कार्यालयास माहिती दिली. त्यानुसार उपसंचालक उत्तम सावंत, चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू झाला. . त्यानंतर विभागीय कार्यालयातून सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, फिरते पथकाचे शिशुपाल पवार यांनी चांदोली येथे तपास पथक तयार करून पुढील तपासाची दिशा ठरवली.
त्यानुसार तपास पथकाने सर्वप्रथम आंबा घाटातून व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेकडील उतारावरील आसपासच्या गावात चौकशी केली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १ एप्रिल रोजी हातिव ( गोठणे पुनर्वसित ) गावात जाऊन तपास केला. वन्यजीव विभागाचे तपास पथक पोहचताच गावात संशयास्पद हालचाली सुरु झाल्या. त्यामुळे कसून चौकशी केली असता एक संशयीत आरोपी आढळून आला. त्याला चौकशीसठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्याने व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाना शिकारीच्या उद्देशाने प्रवेश केल्याचे मान्य केले. दोन एप्रिलला तपासाअंती सदर प्रकरणात अजून दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मारळ(ता. संगमेश्वर) येथील दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या तिन्ही आरोपींनी वन्यजीव विभागाच्या हद्दीत शस्त्रास्त्रासह शिकारीसाठी गेल्याने कॅमेऱ्यात आल्याचे कबूल करून गुन्हा मान्य केला. त्यांची देवरूख येथे वैद्यकीय चाचणी केली. देवरुखचे न्यायाधीश रजेवर असल्याने रत्नागिरीच्या न्यायाधीशांनी आरोपींना ७ एप्रिल पर्यंत ५ दिवसाची वनकोठडी सुनावली.
सदर गुन्ह्यात अजून आरोपी असण्याची शक्यता, गुन्ह्यात वापरलेली शस्त्र जप्त करणे, वन्यप्राण्याच्या शिकारीचा प्रकार या शक्यतांमुळे आरोपींना जामीन मिळू शकला नाही. त्यांच्या कडून हस्तगत केलेल्या मोबाईलमध्ये संशयास्पद छायाचित्रे आढळून आल्याने अधिकचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत, उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, चांदोली वन्यजीवचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलावडे, फिरते पथकचे वनक्षेत्रपाल शिशुपाल पवार, वनपाल निवळे एच.ए. गारदी, वनरक्षक गोठणे, रामदास दणाने वाहनचालक सचिन पावर, अनंत मुळे, सागर पाटील, वन्यजीवप्रेमी प्रतिक मोरे यांनी केली. त्यांना रत्नागिरी वन विभागाचे विभागीय वनाधिकारी दिपक खाडे, वनक्षेत्रपाल श्रीमती प्रियंका लगड, वनपाल देवरूख तौफिक मुल्ला, वनरक्षक गावडे व पोलिस पाटील, सरपंच यांची मदत मिळाली.