(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील काही आंदोलकांना व्हॉटस्ॲपवरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना बेदखल करणेच योग्य आहे.त्यांना प्रतिक्रीया देण्याची गरज काय? तसेच संभाजीनगरात काही आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त पसरल्याचे समजते आहे. मात्र ते अधिकृत आहे की नाही याबाबत माहिती नाही. परंतु अशा वृत्तांना घाबरून कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेऊ नये, उलट संपात उतरावे असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे रत्नागिरी तालुका सचिव प्रशांत जाधव यांनी केले आहे.
पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे तो संविधानिक आहे तो ज्यांनी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला त्यांची पेन्शन सुरू आहे अशा लोकप्रतिनिधींनी पेन्शन मागणाऱ्यांवर मेस्मा लावण्याची धमकी देऊ नये असे त्यांनी म्हटले आहे. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाची त्यांनी आठवण करून दिली त्यांचा वीस दिवस रेल्वे ठप्प करणारा संप जगातील एकमेव ठरला होता, तसा 1976 चा आपला संप यशस्वी झाला. त्यानंतर एकजूट कमी झाली आणि आज अन्याय होऊ लागला आहे आणि तो वाढू लागला आहे, असेही त्यांनी म्हटले. आपला संप राज्यव्यापी आहे. तब्बल 18 लाख कर्मचाऱ्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणीही करू नये. कारण कर्मचाऱ्यांचे सहकारी, मित्र परिवार, कुटुंबीय, नातेवाईक, समाजबांधव त्यांच्यासोबत आहेत. सरकारने आमच्या प्रति अजुनही संवेदनशीलता दाखवावी आणि मते आणि मने जिंकावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे
तसेच जुन्या पेन्शन योजनेसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. सदर समितीचा आम्ही निषेध करत असून कुठल्याही प्रकारची नवी पेन्शन किंवा सुधारित योजना आमच्या कर्मचाऱ्यांकडून स्वीकारली जाणार नाही, तथापि जुनी पेन्शन जशीच्या तशी ती सुद्धा पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावी, अशी आम्हा कर्मचाऱ्यांची एकमुखी मागणी आहे. त्या समितीने लोकप्रतिनिधींच्या पेन्शनची समीक्षा करण्यास हरकत नाही.
दरम्यान मागील काही वर्षांपूर्वी शिक्षण सेवक पद लादले गेले. त्यावेळी संघर्ष कमी पडला हे ओळखून संघटनांनी आणखी जोर लावून संघर्ष करण्याची गरज होती मात्र एकजूट नसल्याने दुसरा हल्ला हा जुनी पेन्शन योजना रद्द करण्याचा झाला. आज तब्बल दशकांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर या योजनेला विरोध होऊ लागला आहे. आज वेळ हाताच्या बाहेर गेल्यानंतर कर्मचारी जागे झाले आहेत. असे यापुढे जागे होणे कर्मचाऱ्यांना परवडणारे नसून आत्ताच जागे झाले आहेत तर संघर्ष अर्ध्यावर सोडू नये. आपल्या न्याय मागण्या मान्य करून घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भोजे, सचिव सागर पाटील, चंद्रकांत चौगुले, दत्तात्रय क्षीरसागर, कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, संतोष कांबळे, राज्याचे कार्यकारिणी सदस्य गौतम कांबळे, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक हित समितीचे समन्वयक मोहन बापट, इंद्रसिंग वळवी, श्री. मुळीक, श्री शेख, सुनिल जाधव, वैभव जाधव, सौ.घाटविलकर सौ नार्वेकर, श्री पाटील आदी उपस्थित होते.