(अहमदाबाद)
गुजरातमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. अनेक जिल्ह्याना या पावसाचा फटका बसला आहे. या पावसाचे पाणी नद्यांना आलेल्या पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या पावसाने आतापर्यंत ११ जणांचा बळी घेतला आहे.
गुजरातमध्ये गेल्या तीन -चार दिवसांपासून मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. जुनागड, नवसारी, वलसाड, सुरत, जामनगर, कच्छ या जिल्ह्याना पावसाचा अधिक तडाखा बसला आहे. अनेक गावांमध्ये तसेच शहरांमध्ये कमरेएवढे पाणी साचले आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने पाणी पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. ५ जुलै पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. आतापर्यंत या पावसाने ११ जणांचा बळी घेतला असून त्यातील ६ जण एकट्या जामनगर जिल्ह्यातील आहेत. जुनागड मध्ये पूरसदृश स्थिती आहे. या जिल्ह्यातील एका गावात दोन शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले होते. एनडीआरएफने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. अखेर त्यांना हेलिकॅफ्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.
गुजरात मधील परिस्थितीवर आमची नजर असून या पावसामुळे बेघर झाल्याना आवश्यक ती मदत गुजरात सरकार आणि केंद्राकडून केली जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे.