गुजरात विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपने १५६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली. भूपेंद्र पटेल हे दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दरम्यान, एडीआर रिपोर्टनुसार नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या १८२ आमदारांपैकी एकूण १५१ आमदार कोट्यधीश आहेत. यात विशेष ७४ असे आमदार पुन्हा निवडून आले आहेत, ज्यांची मालमत्ता सरासरी २.६१ कोटी रुपयांनी वाढली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. २०१७ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या कोट्याधीश म्हणजे एक कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या आमदारांची संख्या १४१ होती. यावेळी विधानसभेवर निवडून आलेले ८३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत.
या रिपोर्टमधून असे समोर आले आहे की, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक म्हणजे तब्बल १३२ आमदार कोट्यधीश आहेत, त्यापाठोपाठ काँग्रेसचे १४, तीन अपक्ष, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाचा प्रत्येकी एक आमदार करोडपती आहे. १५१ कोट्यधीश आमदारांपैकी ७३ आमदारांकडे ५ कोटींहून अधिक संपत्ती आहे तर ७३ आमदारांकडे २ कोटी ते ५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.