(पुणे)
एका महिला पोलिस आणि तिच्या पतीने एका व्यावसायिकाला व्यवसायात गुंतवणूक केल्यास २० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत एकाकडून तब्बल १९ लाख ५० हजार रुपये गुंतवणुकीच्या बहाण्याने घेतले. मात्र, परतावा न देता, त्याची फसवणून करणाऱ्या या महिला पोलिस यांनी तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती शंकर गायकवाड (वय ५०), पती शंकर लक्ष्मण गायकवाड (वय ५४, दोघे रा. रास्ता पेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पती पत्नीची नावे आहेत. या प्रकरणी सदाशिव राजाराम नलावडे (वय ५२, रा. रास्ता पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नलावडे यांचे मोटार दुरुस्तीचे गॅरेज आहे तर ज्योती गायकवाड पोलीस आहेत तर त्यांचा पतीचे मोटार दुरुस्तीचे गॅरेज आहे.
गायकवाड या त्यांच्या पतीसह नलावडे यांच्या गॅरेजमध्ये कार दुरस्तीसाठी द्यायचे. त्यामुळे त्यांची नलावडे यांच्याशी ओळख झाली होती. ज्योती गायकवाड यांनी पोलीस आयुक्तालायत नोकरीस असल्याचे सांगितले होते. आपली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असून गायकवाड यांच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास २० टक्के परतावा देण्याचे आमिष गायकवाड यांनी नलावडे यांना दिले.
यामुळे नलावडे यांनी विश्वास ठेवत गायकवाड यांना वेळोवेळी जवळपास १९ लाख ५० हजार रुपये व्यवसायांत गुंतवणुकीसाठी दिली. याबाबत त्यांनी पुन्हा गायकवाड यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा पैसे टप्याटप्याने परत करतो, असे त्यांनी सांगितले. या नंतर वेळोवेळी नलावडे यांनी परतव्याची मागणी केली. तेव्हा गायकवाड यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. नलावडे यांनी पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी नलावडे यांना धनादेश दिले. मात्र खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटले नाहीत.
दरम्यान कालावधीत पैसे परत न केल्याने नलावडे यांनी वकिलांमार्फत गायकवाड यांना नोटीस बजावली. गायकवाड दाम्पत्य घर बंद करुन निघून गेल्याचे लक्षात आल्यानंतर नलावडे यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला. न्यायालयाने गायकवाड दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.